आता सुरू होतेय मोदींची 'खरी परीक्षा', पुन्हा जमेल का '११६'चा करिष्मा?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 01:46 PM2019-04-30T13:46:50+5:302019-04-30T13:49:19+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या शिलेदारांची खरी परीक्षा पुढच्या तीन टप्प्यांमध्ये असेल.
लोकसभेच्या एकूण ५४३ जागांपैकी ३७४ मतदारसंघांमध्ये मतदान 'सुफळ संपूर्ण' झालं आहे. म्हणजेच, जवळपास ७० टक्के मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसं पाहिलं तर, या प्रतिष्ठेच्या लढाईत, भाजपा आणि काँग्रेससाठी प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळेच ते सर्वशक्तीनिशी प्रयत्न करत आहेत. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या शिलेदारांची खरी परीक्षा पुढच्या तीन टप्प्यांमध्ये असेल, असं जाणकारांचं म्हणणं आहे. कारण, या टप्प्यांतील १६९ जागांपैकी बहुतांश जागा हिंदी पट्ट्यातील आहेत. या १६९ पैकी ११६ जागांवर गेल्या निवडणुकीत 'कमळ' फुललं होतं आणि या दणदणीत यशाच्या जोरावरच भाजपानं थाटात सरकार स्थापन केलं होतं. हा करिष्मा मोदींना पुन्हा जमेल का, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
मध्य प्रदेशात लोकसभेच्या एकूण २९ जागा आहेत. त्यापैकी फक्त सहा जागांवर पहिल्या चार टप्प्यांमध्ये मतदान झालं आहे. उर्वरित २३ जागा पाचव्या, सहाव्या आणि सातव्या टप्प्यांत विभागल्या गेल्या आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपाने मध्य प्रदेशातील २९ पैकी २६ जागा जिंकल्या होत्या. परंतु, डिसेंबर महिन्यात झालेल्या मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत राज्याची सत्ता भाजपाच्या हातून काँग्रेसच्या 'हाता'त गेलीय. त्यामुळे लोकसभेचं गणितही बदलू शकतं. स्वाभाविकच, मोदींना आणि भाजपाला इथे बराच घाम गाळावा लागेल.
उत्तर प्रदेशात पाचव्या टप्प्यांत १४, सहाव्या टप्प्यांत १४ आणि शेवटच्या सातव्या टप्प्यांत १३ जागांवर मतदान होणार आहे. म्हणजेच निम्मं उत्तर प्रदेश राज्य अजून बाकी आहे. सर्वाधिक ८० खासदार या राज्यातून जात असल्यानं त्याचं महत्त्व वेगळं सांगायची गरज नाही. यूपीत गेल्या वर्षी मोदी लाट उसळली होती. यावेळी सपा-बसपा ऐक्य आणि प्रियंका गांधींची एन्ट्री या आव्हानांचा सामना मोदींना करावा लागणार आहे.
राजस्थानमध्येही २५ पैकी १२ जागांवर अद्याप मतदान व्हायचंय. २०१४ मध्ये सर्वच्या सर्व जागा भाजपाने जिंकल्या होत्या. परंतु, चार महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत तिथल्या जनतेनं वसुंधरा राजेंचं संस्थान खालसा करून भाजपाला झटका दिला आहे. अर्थात 'मोदी तुझसे बैर नही, वसुंधरा तेरी खैर नही', असा नारा त्यांनी दिला होता. त्यामुळे लोकसभेसाठी राजस्थानी मतदार मोदींसोबत जातात का, हे पाहावं लागेल. त्यासोबतच, शेवटच्या तीन टप्प्यांमध्ये बिहारमधील २१ जागांवर मतदान होणार आहे. नितीशकुमार आणि रामविलास पासवान यांची साथ भाजपाला किती फायदेशीर ठरते, यावर बिहारमधील हार-जीत अवलंबून आहे.
पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण ४२ जागा आहेत. त्यातल्या २४ जागांवर मतदान व्हायचंय. ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदींमध्ये सुरू झालेल्या शाब्दिक चकमकीतून या दोन डझन जागा किती निर्णायक आहेत, याचा अंदाज येऊ शकतो. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाला पश्चिम बंगालमध्ये फक्त दोन जागा जिंकता आल्या होत्या. ही संख्या वाढवून अन्य राज्यांमध्ये होणारं नुकसान भरून काढण्याचं गणित भाजपानं मांडलंय. ते कितपत यशस्वी होतं, हे २३ तारखेलाच कळेल.
या मोठ्या राज्यांसोबतच, झारखंड (११) , हरियाणा (१०), दिल्ली (७), पंजाब (१३) आणि हिमाचल प्रदेश (४), चंदीगडमध्येही मतदान शिल्लक आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या काल झालेल्या चौथ्या टप्प्यात देशात ६४ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास, मुंबईत मतदानाचा टक्का वाढल्याचं दिसतंय. ही वाढीव मतं कुणासाठी उपयुक्त ठरतात, याबद्दल उलटसुलट चर्चा रंगली आहे.