Lok Sabha Election 2019: नाशकात भुजबळांपैकी कोण; काका की पुतणे?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 04:28 AM2019-03-12T04:28:44+5:302019-03-12T04:29:22+5:30
छगन भुजबळ की पुतणे समीर, याचा फैसला अद्याप भुजबळ कुटुंबीयांत होऊ शकलेला नाही.
नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातून भुजबळ कुटुंबीयांपैकी एकजण निवडणूक रिंगणात असेल असे पक्ष पातळीवरच जाहीर करण्यात आले असले तरी उमेदवार कोण? छगन भुजबळ की पुतणे समीर, याचा फैसला अद्याप भुजबळ कुटुंबीयांत होऊ शकलेला नाही.
जिल्ह्यातील दोनही लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉँग्रेसला सोडण्यात आलेले आहेत, त्यातील नाशिक मतदारसंघावर २००९ पासून भुजबळ कुटुंबीयांचा दावा आहे. छगन भुजबळ यांचे पुतणे समीर यांनी २००९ मध्ये सेनेचे उमेदवार दत्ता गायकवाड यांच्यासह तत्कालीन मनसेचे उमेदवार व विद्यमान सेनेचे खासदार हेमंत गोडसे यांचा पराभव केला होता.
महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी भुजबळ काका-पुतणे सुमारे अडीच वर्षे तुरुंगात होते. त्यांची जामिनावर सुटका झाली. तुरुंगातून सुटल्यानंतर छगन भुजबळ आक्रमकपणे राजकारणात सक्रीय झालेले पाहता लोकसभेचे उमेदवार तेच असतील अशी अटकळ बांधण्यात येत आहे, परंतु समीर भुजबळ यांनी गेल्या दोन महिन्यांपासून पक्षाची व विशेष करून नाशिक लोकसभा मतदारसंघाची सारी सूत्रे हाती घेतली आहेत.