अखिलेश यांनी प्रचारात आणले योगी आदित्यनाथांचे 'डुप्लिकेट', काढतील का भाजपाची विकेट?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 05:45 PM2019-05-16T17:45:46+5:302019-05-16T17:48:34+5:30
अखिलेश यांच्या साथीला योगी आदित्यनाथांचे डुप्लिकेट
लखनऊ: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासोबत दिसणारी एक व्यक्ती सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरते आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखी दिसणारी ही व्यक्ती सध्या अखिलेश यांच्या सावलीसारखी त्यांच्यासोबत असते. कालच अखिलेश यांनी चार्टर्ड प्लेनमधला एक फोटो ट्विट केला. त्यातही योगींप्रमाणे दिसणारी ती व्यक्ती होती.
काल अखिलेश यादव यांनी फोटो ट्विट करताच योगी आदित्यनाथ चार्टर्ड विमानात अखिलेश यांच्यासोबत कसे, असा सवाल अनेकांच्या मनात आला. अखिलेश यांचा तो फोटो सोशल मीडियावर व्हायरलदेखील झाला. 'आम्ही मुख्यमंत्री निवासस्थान सोडताच त्यांनी ते गंगेच्या पाण्यानं धुतलं. तेव्हाच आम्ही ठरवलं होतं, त्यांना पुरी खायला घालू,' असं अखिलेश यांनी ट्विटमध्ये म्हटल्यानं चर्चेला आणखी उधाण आलं. मात्र त्यानंतर ते योगी नसून त्यांचे डुप्लिकेट असल्याची माहिती समोर आली.
जब उन्होंने हमारे जाने के बाद मुख्यमंत्री आवास को गंगा जल से धोया था तब हमने भी तय कर लिया था कि हम उनको पूड़ी खिलाएँगे! pic.twitter.com/9GubzO1hOW
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) May 15, 2019
योगी आदित्यनाथांप्रमाणे दिसणाऱ्या, अखिलेश यांच्यासोबत असणाऱ्या त्या व्यक्तीचं नाव सुरेश ठाकूर आहे. ते लखनऊच्या केंट भागात राहतात. ते बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. ठाकूर योगींप्रमाणेच भगवं वस्त्र परिधान करतात, कानात बाळी घालतात. त्यांची वेशभूषा पूर्णपणे आदित्यनाथांसारखी आहे. माझा चेहरा योगी आदित्यनाथांसारखा दिसतो, त्याला मी काय करणार?, असा सवाल ठाकूर यांनी उपस्थित केला. 'मला पाहून लोकांना आनंद वाटतो, हे पाहून छान वाटतं. मी कायम अशाच प्रकारची वस्त्रं परिधान करतो. भगव्या रंगाला लोकांनी हिंसेचं प्रतीक केलं आहे. मात्र मी अहिंसेचा पुरस्कार करतो. कारण मी बौद्ध धर्माचा अनुयायी आहे,' असं ठाकूर यांनी म्हटलं.