सोलापूरात निकाल वंचित बहुजन आघाडीविरोधात गेल्यास भाजपाचं एकही कार्यालय ठेवणार नाही- भीम आर्मी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 09:51 PM2019-05-22T21:51:16+5:302019-05-22T21:54:47+5:30
प्रकाश आंबेडकरांकडून कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन
सोलापूर: लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर आला असताना चिथावणीखोर विधानं येण्यास सुरुवात झाली आहे. सोलापूर मतदारसंघात निकाल वंचित बहुजन आघाडीविरोधात गेल्यास भाजपाचं एकही कार्यालय ठेवणार नाही, अशी धमकी भीम आर्मीकडून देण्यात आली आहे. यावर भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शांततेचं आवाहन केलं आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक लढवली आहे. या मतदारसंघातील निकाल विरोधात गेल्यास भाजपाचं एकही कार्यालयं ठेवणार नाही. भाजपाच्या नेत्यांना फिरू देणार नाही, असा इशारा भीम आर्मीनं दिला. सोलापूरात आंबेडकर यांच्या विरोधात भाजपाचे डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे रिंगणात आहेत.
भीम आर्मीच्या धमकीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं. एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी हे आवाहन केलं. 'निवडणुकीचे निकाल काहीही लागले, तरी हिंसाचार होणार नाही याची काळजी घ्या. भीम आर्मीचा हिंसाचार आम्हाला मान्य नाही. त्याला कार्यकर्त्यांनी बळी पडू नये,' असं आवाहन आंबेडकरांनी केलं. शांततेचा भंग होणार नाही, याची काळजी घ्या. कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यालयाचं नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्या, असं आवाहन त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केलं.