दहशतवाद्यांना संपवण्याआधी जवानांनी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यायची का?- मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 15:49 IST2019-05-12T15:39:46+5:302019-05-12T15:49:33+5:30
काश्मीरमधील सुरक्षा दलांच्या कारवाईचा उल्लेख करत मोदींचा सवाल

दहशतवाद्यांना संपवण्याआधी जवानांनी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यायची का?- मोदी
लखनऊ: दहशतवाद्यांना संपवण्याआधी जवानांनी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यायची का, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनसभेला संबोधित करताना विचारला. दहशतवादी बॉम्ब, बंदूक घेऊन समोर उभे असताना जवानांनी निवडणूक आयोगाकडे जाऊन गोळ्या घालण्यासाठी परवानगी मागायची का, असा प्रश्न मोदींनी उपस्थित केला. ते उत्तर प्रदेशातल्या कुशीनगरमध्ये बोलत होते.
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातल्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशात आलेल्या मोदींनी जनसभेला संबोधित करताना आज सकाळी जम्मू-काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात कारवाईचा संदर्भ दिला. आज सुरक्षा दलाच्या जवानांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. मोदींनी त्यांच्या भाषणात या कारवाईचा उल्लेख केला. 'काश्मीरमध्ये काही दहशतवादी मारले गेल्याचं आज सकाळीच समजलं. आता काही लोकांचा प्रश्न आहे की मतदान सुरू असताना मोदींनी दहशतवाद्यांना का मारलं. दहशतवाद्यांना मारण्याआधीही जवानांनी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यायची का,' असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
काश्मीरमध्ये सतत स्वच्छता अभियान सुरू असतं. दर दोन-तीन दिवसांनी स्वच्छता होत असते. हे स्वच्छता अभियान राबवणं माझं काम आहे, अशा शब्दांत मोदींनी दहशतवाद्यांवरील कारवाईचा उल्लेख केला. भगवान श्रीरामाचं नाव घेतल्यानं तुरुंगात टाकणाऱ्यांना लोकशाहीच्या माध्यमातून शिक्षा देण्याचं आवाहन मोदींनी केलं. तुमचं मत माझ्यासाठी गरजेचं आहे. पवित्र आणि अमूल्य आहे, असं मोदी म्हणाले.