Lok Sabha Election 2019: बेगुसरायचा पाकिस्तान होऊ देणार नाही- गिरीराज सिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 08:46 AM2019-04-29T08:46:06+5:302019-04-29T08:48:58+5:30
गिरीराज सिंह यांच्यासमोर कन्हैया कुमारचं आव्हान
पाटणा: बेगुसरायचा पाकिस्तान होणार नाही, असं केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे उमेदवार गिरीराज सिंह यांनी म्हटलं आहे. काही जणांकडून बेगुसरायचा पाकिस्तान करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांचा फणा ठेचण्यासाठी पक्षानं आपल्याला उमेदवारी दिल्याचं सिंह म्हणाले. बिहारमधील पाच जागांवर आज मतदान होत आहे. यातल्या बेगुसराय मतदारसंघातील लढतीकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार यांनी गिरीराज सिंह यांच्याकडे आव्हान उभं केलं आहे. कन्हैया कुमार सीपीआयकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
हिंदूंना शिव्या देणाऱ्या, हिंदू गोमांस खातात अशी बेताल विधान करणाऱ्यांना हिंदू सहन करणार नाहीत. हिंदू हा अपमान सहन न करता असे विषारी फणे ठेचून काढेल, असं गिरीराज सिंह म्हणाले. स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेण्यासाठी आज काल काही जण हिंदूंना शिव्या देतात. वंदे मातरमवरुनही देशात वाद होतो. देशातील प्रत्येक व्यक्तीनं वंदे मातरम म्हणायला हवं. मग ती व्यक्ती हिंदू असो वा मुस्लिम. एखादी व्यक्ती वंदे मातरम म्हणत नसेल, तर देशातली जनता त्या व्यक्तीला माफ करणार नाही, असंदेखील गिरीराज यांनी म्हटलं.
गिरीराज यांनी सीपीआयचे उमेदवार कन्हैया कुमार यांनाही लक्ष्य केलं. कन्हैया कुमार तुकडे-तुकडे गँगचे सदस्य आहेत. ते देशाचे तुकडे करण्याचे प्रयत्न करत आहेत, असा आरोप गिरीराज यांनी केला. यावेळी त्यांनी महाआघाडीवरही निशाणा साधला. महाआघाडीकडे पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही.मात्र एनडीएकडे नरेंद्र मोदींसारखी व्यक्ती पुन्हा एकदा पंतप्रधानपदासाठी दावेदार आहे, असं गिरीराज म्हणाले.