अर्ध्या किमतीत दारू, ईदला बकरा अन् बरंच काही; 'या' पक्षाकडून आश्वासनांची खैरात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 06:09 PM2019-04-17T18:09:39+5:302019-04-17T18:15:35+5:30
निवडणूक जिंकण्यासाठी आश्वासनांचा पाऊस
नवी दिल्ली: निवडणूक आली की मतदार राजा होतो अन् त्या राजावर आश्वासनांचा पाऊस पडू लागतो. त्यामुळेच राजकीय पक्ष त्यांच्या जाहीरनाम्यांमधून मतदारांना अनेक आश्वासनं देतात. काँग्रेस, भाजपा या प्रमुख राजकीय पक्षांनी त्यांचे जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत. दिल्ली काबीज करण्यासाठी दोन्ही पक्ष प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. मात्र दिल्लीत एका वेगळ्याच पक्षाच्या जाहीरनाम्याची चर्चा आहे.
सांझी विरासत पार्टीनं दिल्लीतील मतदारांना भरमसाठ आश्वासनं दिली आहेत. निवडून दिल्यास सर्वांना निम्म्या किमतीत दारू, मुस्लिम कुटुंबांना ईदला मोफत बकरा, महिलांना मोफत सोनं अशी आश्वासनं पक्षाकडून देण्यात आली आहेत. पक्षानं या सर्व आश्वासनांचा समावेश आपल्या जाहीरनाम्यात केला आहे. पक्षाचे उमेदवार अमित शर्मा यांच्या पोस्टरवर या सर्व आश्वासनांचा उल्लेख आहे. शर्मा ईशान्य दिल्लीतून निवडणूक लढवत आहेत.
सांझी विरासत पार्टीनं जाहीरनाम्यातून आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. पीएचडीपर्यंतचं शिक्षण मोफत, दिल्लीत विद्यार्थ्यांना बस सेवा मोफत, मोफत अन्न धान्य पुरवठा, मुलीच्या जन्मानंतर 50 हजार, मुलीच्या लग्नावेळी अडीच लाख, बेरोजगारांना महिन्याला 10 हजार रुपये, ज्येष्ठांना, अपंगांना 5 हजारांचं निवृत्त वेतन, खासगी रुग्णालयात 10 लाखांपर्यंतचे उपचार मोफत अशी आश्वासनं सांझी विरासत पार्टीनं दिली आहेत.