नाराज अनिल गोटेंचा भाजपाला रामराम; अपक्ष अर्ज भरुन देणार भामरेंना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 04:33 PM2019-04-08T16:33:41+5:302019-04-08T18:45:11+5:30
सुभाष भामरेंविरोधात गोटे शड्डू ठोकणार
धुळे: भाजपाचे नाराज आमदार अनिल गोटेंनीभाजपाला रामराम केला आहे. त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. अनिल गोटे उद्या अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे धुळ्यात भाजपाचे नेते आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या अडचणी वाढणार आहेत.
अनिल गोटे गेल्या काही महिन्यांपासून पक्षावर नाराज होते. त्यामुळेच त्यांनी आज पक्ष सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा पाठवला. तर विधानसभेच्या अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामा पाठवून दिला. उद्या ते लोकसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे भाजपाचे उमेदवार सुभाष भामरे यांना आव्हानाचा सामना करावा लागेल.
स्थानिक राजकारणात फारसं महत्त्वं दिलं जात नसल्यानं गोटे पक्षापासून दूर गेले होते. जलसंपदा गिरीश महाजन यांच्या वाढत्या प्राबल्यामुळे गोटे नाराज होते. डिसेंबरमध्ये झालेल्या धुळे महापालिकेच्या निवडणुकीत गोटे यांनी लोकसंग्राम पक्षाची स्थापना करत उमेदवार उभे केले. मात्र त्यात त्यांना अपयश आलं आणि भाजपानं स्पष्ट बहुमत मिळवलं. यानंतर गोटे पक्षापासून आणखी दूर गेले.
गेल्याच महिन्यात गोटेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. गोटे 26 वर्षांचं वैर विसरुन पवारांच्या भेटीला गेल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तेव्हाच गोटेंनी भामरेंविरोधात शड्डू ठोकमार असल्याचं म्हटलं होतं. त्यासाठीच्या मोर्चेबांधणीसाठी गोटेंनी पवारांची भेट घेतली होती. 'धुळ्यात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. गुन्हेगारी, टक्केवारी वाढली आहे. पक्षातील ही घाण साफ करायची आहे,' असं गोटे म्हणाले होते. 'मी माझी भूमिका शरद पवारांना सांगितली आहे. मला माझा पक्ष स्वच्छ करायचा आहे. आता मला कशी मदत करायची, हा त्यांचा निर्णय असेल,' असंदेखील गोटेंनी म्हटलं होतं.