Video: तुम्हाला २००० रुपये मिळाले ना?; शेतकरी एकसुरात 'नाही' म्हणाले अन् राजनाथ गप्पच झाले!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 04:32 PM2019-04-11T16:32:41+5:302019-04-11T16:42:48+5:30
शेतकऱ्यांच्या प्रतिसादानं राजनाथ सिंह यांची कोंडी
पाटणा: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी बिहारच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहांना नाचक्कीचा सामना करावा. पूर्णियात एनडीए उमेदवाराच्या प्रचारासाठी गेलेले राजनाथ सिंह शेतकऱ्यांना संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेच्या अंतर्गत तुमच्या खात्यात 2 हजार रुपये मिळाले का, असा प्रश्न विचारला. यानंतर शेतकऱ्यांनी दिलेल्या प्रतिसादानंतर राजनाथ सिंह यांना चांगलीच नाचक्की सहन करावी लागली.
पूर्णियाच्या धमदहा उच्च विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेला काल (10 एप्रिलला) राजनाथ सिंह संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या योजनांचा पाढा वाचून दाखवला. आयुष्यमान भारत, कृषी सन्मान योजनेबद्दल ते बोलत होते. शेतकऱ्यांना वर्षाकाठी मिळणाऱ्या 6 हजारांच्या मदतीबद्दल राजनाथ सिंह भरभरुन बोलले. तुम्हाला आता 2000 रुपयांचा पहिला हफ्ता मिळाला का, असा प्रश्न सिंह यांनी विचारला. त्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांनी एका सूरात नाही असं उत्तर दिलं.
कड़ी निंदा.......बहुत कड़ी निंदा! pic.twitter.com/sNKEGJJQn8
— Munna Tripathi (@MunnaTripathi17) April 10, 2019
शेतकऱ्यांनी दिलेल्या या प्रतिसादामुळे राजनाथ सिंह यांची चांगलीच कोंडी झाली. यानंतर त्यांनी कोणाच्या खात्यात तरी रक्कम झाली असेल ना?, असा प्रश्न केला. तेव्हा शेतकऱ्यांकडून प्रतिसादच आला नाही. त्यावर असं कसं होऊ शकतं? कोणाला तरी लाभ मिळाला असेल? ज्यांना मिळाला, त्यांना आपले हात वर करा. ज्यांना लाभ मिळाला, त्यांनीच आपले हात वर करावेत, असं राजनाथ सिंह म्हणाले. एकाही शेतकऱ्यानं हात वर केला नाही. त्यानंतर राजनाथ यांनी मंचावर बसलेल्या नेत्यांना योजनेचा लाभ का मिळाला नाही, असा प्रश्न विचारण्यात आला. या संपूर्ण प्रकारामुळे राजनाथ यांची चांगलीच कोंडी झाली.