'मोदीजी, व्यासपीठावर शहिदांचे फोटो लावून भाषणं करायला लाज वाटत नाही का?'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 09:01 PM2019-04-12T21:01:37+5:302019-04-12T21:04:49+5:30
राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
नांदेड: पुलवामात शहीद झालेल्या जवानांचे फोटो व्यासपाठीवर लावून भाषणं करायला पंतप्रधान नरेंद्र मोदींना लाज वाटत नाही का?, असा सवाल करत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पंतप्रधानांवर हल्लाबोल केला. पुलवामात शहीद झालेल्या जवानांच्या नावानं मतं कसली मागता? एअर स्ट्राइक करणाऱ्या जवानांच्या नावानं मतांचा जोगवा कशासाठी? निवडणुकीला शहीद जवान उभे आहेत की एअर स्ट्राइक करणारे विंग कमांडर अभिनंदन?, असे सवाल करत राज यांनी पंतप्रधानांना लक्ष्य केलं. ते नांदेडमध्ये बोलत होते.
नोटाबंदीनंतर केलेल्या भाषणात मोदी स्वत:च्या जीवाला धोका आहे, असं म्हणत होते. मग हेच मोदी आता देश सुरक्षित हातात असल्याचं कसं काय सांगतात? जो माणूस स्वत:च्या जीवाला धोका असल्याचं सांगतो. तोच माणूस त्याच्या हातात देश सुरक्षित आहे, असं कसं काय म्हणतो?, जो माणूस स्वत:चं असुरक्षित आहे, त्याच्या हाती देश सुरक्षित कसा असू शकतो?, असे प्रश्न उपस्थित करत राज यांनी पंतप्रधान मोदींवर तोफ डागली. ज्यावेळी मोदी त्यांच्या हातात देश सुरक्षित आहे, असं म्हणत होते. त्यावेळी त्यांच्या व्यासपीठावर पुलवामातील शहीद जवानांचे फोटो होते. मोदीजी, जवानांचे फोटो व्यासपीठावर लावून मतं मागायला तुम्ही लाज वाटत नाही का?, असा प्रश्न राज यांनी विचारला.
पुलवामा हल्ल्यासाठी वापरण्यात आलेलं आरडीएक्स आलं कुठून याचं उत्तर मोदींनी देशाला द्यावं, अशी मागणी राज यांनी केली. एअर स्टाईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले, त्याचा आकडा माहीत नसल्याचं हवाई दलाचे प्रमुख सांगतात. मग त्याआधीच भाजपाचे अध्यक्ष अमित शहा 250 दहशतवादी मारल्याचा दावा कसा काय करतात?, असा सवाल विचारत मोदी आणि शहा हे देशाच्या क्षितिजावरुन दूर होणं गरजेचं असल्याचं राज म्हणाले. देशाच्या 40 जवानांचे प्राण हकनाक गेले. त्या जवानांच्या कुटुंबीयांनी एअर स्ट्राइकचे पुरावे मागितल्यावर त्यांना भाजपा नेता देशद्रोही कसा काय म्हणतो?, असा सवाल राज यांनी विचारला.