मोदींनी निवडणूक प्रचारासाठी 40 जवान मारले का? राज ठाकरेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 08:45 PM2019-04-17T20:45:20+5:302019-04-17T20:48:26+5:30
राज ठाकरेंनी व्यक्त केला पुलवामा हल्ल्याबद्दल शक्यता
सातारा: पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकसभा निवडणुकीत प्रचार करायचा होता म्हणून 40 जवान मारण्यात आले का, असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरेंनी उपस्थित केला. मोदी त्यांच्या सभेत वारंवार पुलवामा हल्ल्याचा उल्लेख करतात. मोदींना प्रचार करता यावा म्हणून आमचे 40 जवान मारले गेले का, प्रचारात भाषणं करता यावीत यासाठी पुलवामा घडवण्यात आलं का असे प्रश्न राज यांनी उपस्थित केले. ते साताऱ्यात बोलत होते.
पुलवामातील हल्ल्यावरुन राज ठाकरेंनी मोदींवर तोफ डागली. यावेळी त्यांनी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेलं भाषण स्क्रीनवर दाखवलं. 'सीआरपीएफ, लष्कर, पोलीस सर्वकाही सरकारच्या ताब्यात असताना दहशतवादी सीमा ओलांडतात कसे? त्यांना पैसा येतो कुठून? सर्व यंत्रणा तुमच्या हातात असताना हे सगळं कसं काय होतं?' असे सवाल मोदींनी मुख्यमंत्री असताना उपस्थित केले होते. मोदींचा तोच व्हिडीओ दाखवत आता मोदींनी याच प्रश्नांची उत्तरं देशाला द्यावीत, असं राज ठाकरे म्हणाले.
एअर स्ट्राइकवरुन मोदी राजकारण करतात. पाकिस्तानला धडा शिकवल्याचं म्हणतात. मग पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान आम्हाला पुन्हा मोदीच पंतप्रधानपदी हवा, असं कसं काय म्हणतो, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. मोदींच्या सत्ताकाळात सर्वाधिक जवान शहीद झाल्याचा दावा त्यांनी केला. गुजरातचे मुख्यमंत्री असताना पाकिस्तानला लव्ह लेटर लिहिणं बंद करा म्हणणारे, त्यांनी एक मारला तर त्यांचे चार मारा म्हणणारे मोदी पंतप्रधान झाल्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना शपथविधी सोहळ्याला कसे बोलावतात? वाट वाकडी करुन अचानक शरीफ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना केक भरवायला कसे काय जातात? त्यांच्याकडे बिर्याणी कशी खातात? असे प्रश्न राज यांनी विचारले. मोदी हे सर्व करत असताना शहीद जवानांच्या कुटुंबांना काय वाटलं असेल, असा सवाल राज यांनी उपस्थित केला.