मोदींकडून गटार पातळीचं राजकारण; अहमद पटेल यांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 07:29 PM2019-04-05T19:29:55+5:302019-04-05T20:04:54+5:30
अगस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यावरुन भाजपा, काँग्रेसमध्ये जुंपली
नवी दिल्ली: अगुस्ता वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्यावरुन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तराखंडमधल्या जनसभेत काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्यावर सडकून टीका केली. मोदींच्या या टीकेला पटेल यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'नरेंद्र मोदींना सगळे ओळखतात. ते गटार पातळीचं राजकारण करतात,' अशा शब्दांमध्ये पटेल यांनी मोदींवर शरसंधान साधलं. मोदींची भाषा एखाद्या सरपंचाचीसारखी असल्याचंदेखील पटेल म्हणाले.
#WATCH: Ahmed Patel reacts on PM's remark 'Issi chargesheet mein kaha gaya hai 'AP' ka matlab hai 'Ahmed Patel'... Says "Narendra Modi ko sab jante hain, gutter level politics karte hain. Jaise village mukhiya bol raha ho, jaise dehat mein koi municipality politics kar raha ho.." pic.twitter.com/NrhvpOSxD1
— ANI (@ANI) April 5, 2019
मोदींनी आज उत्तराखंडमधील जनसभेत बोलताना अगुस्ता वेस्टलँड घोटाळ्यावरुन गांधी कुटुंब आणि अहमद पटेल यांना लक्ष्य केलं. अगुस्ता प्रकरणातील आरोपपत्रात पटेल यांच्या नावाचा उल्लेख असल्याचं मोदी म्हणाले. या टीकेला अहमद पटेल यांनी प्रत्युत्तर दिलं. 'नरेंद्र मोदींना सगळे ओळखतात. ते गटार पातळीचं राजकारण करतात. ते एखाद्या गावाच्या सरपंचासारखे बोलतात. त्यांच्याकडून महापालिका स्तरावरचं राजकारण सुरू आहे,' असं प्रत्युत्तर पटेल यांनी दिलं.
त्याआधी आज मोदींनी उत्तराखंडमधील जनसभेत अगुस्ता वेस्टलँडवरुन काँग्रेसवर शरसंधान साधलं. चौकीदारानं हेलिकॉप्टर घोटाळ्यातील काही दलालांना दुबईहून भारतात आणलं. यानंतर इटलीच्या मिशेल मामा आणि इतर मध्यस्थांची चौकशी झाली, असं मोदी म्हणाले. 'या प्रकरणाच्या आरोपपत्रात एपी आणि फॅम असा असा उल्लेख आहे. यातील एपीचा अर्थ अहमद पटेल आणि फॅमचा अर्थ फॅमिली असा होतो. आता अहमद पटेल कोणत्या फॅमिलीचे निकटवर्तीय आहेत, हे तुम्हीच मला सांगा,' असं म्हणत मोदींनी गांधी कुटुंबाला लक्ष्य केलं. 'ज्या कुटुंबाची विमानतळावर कोणीही चौकशी करत नव्हतं, ज्यांना सर्वजण सलाम करायचे, ते आज जामीनावर आहेत. जे स्वत:ला देशाचे भाग्यविधाते समजत होते, ते आज तुरुंगवारी टाळण्याचे प्रयत्न करत आहेत,' अशा शब्दांमध्ये मोदींनी गांधी कुटुंबाला लक्ष्य केलं.