आमचा पंतप्रधान पत्रकारांना सामोरा जायला घाबरतो- राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 09:02 PM2019-04-16T21:02:56+5:302019-04-16T21:06:42+5:30
राज ठाकरेंचा मोदींवर जोरदार हल्लाबोल
इचलकरंजी: आमचा पंतप्रधान पत्रकारांना घाबरतो. त्यामुळेच गेल्या पाच वर्षांत मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही, अशा शब्दांमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पुन्हा एकदा पंतप्रधानांवर शरसंधान साधलं. प्रसारमाध्यमांना एकदाही सामोरं न गेलेले नरेंद्र मोदी हे या देशाच्या इतिहासातील एकमेव पंतप्रधान आहेत, अशी टीका राज यांनी केली. ते इचलकरंजीत प्रचारसभेत बोलत होते.
2014 मध्ये लोकांना अच्छे दिनचं स्वप्न दाखवणारे, आश्वासनं देणारे मोदी आज कशालाच बांधील नाहीत. मोदी जनतेच्या प्रश्नांना उत्तरं देत नाहीत. गेल्या निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनांवलर बोलत नाही. आता फक्त पाकिस्तान-पाकिस्तान सुरू आहे. आमचे जवान सीमेवर हकनाक शहीद होतात. मात्र त्याचं यांना काहीही सोयरसुतक नाही. यांना फक्त जवानांवरुन राजकारण करायचं आहे, अशा शब्दांमध्ये राज यांनी पंतप्रधानांवर तोफ डागली.
एअर स्ट्राइकवरुन मोदी राजकारण करतात. पाकिस्तानला धडा शिकवल्याचं म्हणतात. मग पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान आम्हाला पुन्हा मोदीच पंतप्रधानपदी हवा, असं कसं काय म्हणतो, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. मोदींच्या सत्ताकाळात सर्वाधिक जवान शहीद झाल्याचा दावा त्यांनी केला. गुजरातचे मुख्यमंत्री असताना पाकिस्तानला लव्ह लेटर लिहिणं बंद करा म्हणणारे, त्यांनी एक मारला तर त्यांचे चार मारा म्हणणारे मोदी पंतप्रधान झाल्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना शपथविधी सोहळ्याला कसे बोलावतात? वाट वाकडी करुन अचानक शरीफ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना केक भरवायला कसे काय जातात? त्यांच्याकडे बिर्याणी कशी खातात? असे प्रश्न राज यांनी विचारले. मोदी हे सर्व करत असताना शहीद जवानांच्या कुटुंबांना काय वाटलं असेल, असा सवाल राज यांनी उपस्थित केला.