ममता बॅनर्जी विकासाच्या मार्गातील स्पीड ब्रेकर; मोदींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 05:32 PM2019-04-03T17:32:22+5:302019-04-03T17:34:06+5:30
पंतप्रधान मोदींचं ममता बॅनर्जींवर शरसंधान
सिलिगुडी: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर जोरदार हल्लाबोल केला. ममता बॅनर्जी राज्याच्या विकासातील स्पीड ब्रेकर असल्याची टीका मोदींनी केली. ममता बॅनर्जी राज्याच्या विकासात अडथळे आणत असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला. ते सिलिगुडीत एका जनसभेला संबोधित करत होते.
'ममता बॅनर्जी राज्याच्या विकासातील स्पीड ब्रेकर आहेत. मतं मिळवण्यासाठी काँग्रेस आणि ममता बॅनर्जींना गरिबी हवी. गरीब व्यक्ती जेव्हा आजारी असते, तेव्हा उपचार ही सर्वात मोठी समस्या असते. कारण त्यावर मोठी रक्कम खर्च होते. आमच्या सरकारनं गरिबांवर उपचार करता यावेत यासाठी आयुष्यमान भारत योजना सुरू केली. या योजनेच्या अंतर्गत एका वर्षामागे 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र स्पीड ब्रेकर दीदींनी ही योजना पश्चिम बंगालमध्ये रोखून धरली आहे,' अशा शब्दांमध्ये मोदींनी ममता बॅनर्जींवर शरसंधान साधलं.
PM Narendra Modi in Siliguri, West Bengal: There is a speed-breaker in West Bengal which you know by the name of 'Didi'. This 'Didi' is the speed-breaker in your development. pic.twitter.com/0pWec4Qgng
— ANI (@ANI) April 3, 2019
ममता बॅनर्जींच्या सत्ताकाळात गुन्हेगारी वाढल्याचा आरोप त्यांनी केला. तृणमूलचे गुंड दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र आम्ही असताना ते यशस्वी होणार नाहीत, असं पंतप्रधान म्हणाले. ममता बॅनर्जींमुळे पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांपर्यंत केंद्र सरकारची मदत पोहोचत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. 'देशभरातील शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत मदत दिली जात आहे. मात्र दीदींनी यादेखील योजनेला ब्रेक लावला आहे,' अशी टीका त्यांनी मोदींवर केली.