सोमय्यांना शिवसेनेचा विरोध नव्हता; संजय राऊत यांचा यू टर्न
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 08:38 PM2019-04-05T20:38:33+5:302019-04-05T20:40:57+5:30
सोमय्यांची उमेदवारी भाजपचा अंतर्गत मुद्दा; राऊत यांचं घूमजाव
नाशिक- भाजपा खासदार किरीट सोमय्या यांना उमेदवारी देण्यास शिवसेनेचा विरोध नव्हता, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सोमय्या यांच्या उमेदवारीला शिवसेनेला विरोध होता. त्यामुळेच त्यांना भाजपानं उमेदवारी नाकारली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र सोमय्यांची उमेदवारी हा भाजपाचा अंतर्गत मुद्दा असल्याचं राऊत नाशिकमध्ये म्हणाले. विशेष म्हणजे राऊत यांनी वेळोवेळी सोमय्यांच्या उमेदवारीविरोधात भूमिका घेतली होती. राऊत यांचे बंधू आमदार सुनिल राऊत यांनी सोमय्यांविरोधात अपक्ष लढणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्याचंही संजय राऊत यांनीही समर्थन केलं होतं.
किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध असल्याने भाजपनं त्यांना उमेदवारी नाकारल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. सोमय्या यांना उमेदवारी देण्यास शिवसेनेचा विरोध नव्हता. तो भाजपाचा अंतर्गत मुद्दा आहे, असं राऊत म्हणाले. सोमय्या यांनी लोकसभा निवडणुकीत प्रचारात सहभागी होऊ नये, ही शिवसैनिकांची भावना असली तरी ती पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचंदेखील राऊत यांनी सांगितलं.
संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिली जाऊ नये अशी भूमिका घेतली होती. 'सोमय्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांबद्दल ज्या प्रकारची वक्तव्यं केली, ती योग्य नव्हती. टीका करण्यास हरकत नाही, पण आपण कोणत्या भाषेचा वापर करता याचाही विचार करायला हवा होता. कोणत्या मर्यादेपर्यंत टीका करावी हे आधीच ठरवलं पाहिजे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्यांनी भरपूर त्रास दिला. आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना शांत केलं आहे. आता जो निर्णय घ्यायचा आहे तो भाजपाचे दिल्लीतील नेते घेतील,' असं संजय राऊत यांनी 29 मार्च रोजी म्हटलं होतं.