चौकीदाराला चौकीतून हटवण्याची वेळ आली- अखिलेश यादव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 05:04 PM2019-04-07T17:04:55+5:302019-04-07T17:05:08+5:30
अखिलेश यादव यांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
लखनऊ: आता चौकीदाराला चौकीतून हटवण्याची वेळ आली आहे, असं म्हणत समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. निवडणुकीआधी हे चौकीदार झाले आहेत. आता एका-एका चौकीदाराची चौकी काढून घेण्याचं काम आम्ही निवडणुकीत करू, अशा शब्दांमध्ये यादव पंतप्रधानांसह भाजपावर बरसले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज देवबंदमध्ये समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीची संयुक्त सभा झाली. त्यात यादव यांनी भाजपाचा समाचार घेतला.
यंदाची निवडणूक इतिहास घडवू शकते. त्यामुळे आपल्याकडे इतिहास लिहिण्याची संधी आहे, असं उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी म्हटलं. सध्या द्वेष पसरवणारे नेते आले आहेत. हे नेते तिरस्कार पसरवण्याशिवाय काहीच करत नाहीत, अशा शब्दांमध्ये यादव यांनी मोदी आणि योगींना लक्ष्य केलं. सपा-बसपा-आरएलडी महाआघाडीला 'सराब' म्हणणाऱ्या मोदींवर त्यांनी तोंडसुख घेतलं. सराब बोलणारी मंडळी सत्तेच्या नशेत असल्याचं प्रत्युत्तर त्यांनी दिलं.
देशाला तोडण्याचं काम भाजपानं इंग्रजांपेक्षा जास्त केलं आहे. ही मंडळी धर्माची ठेकेदार झाली आहेत, अशी टीका अखिलेश यांनी केली. द्वेषाच्या भिंती पाडण्याची संधी या निवडणुकीमुळे चालून आली आहे. महाआघाडीच्या माध्यमातून आम्ही देशात बदल घडवू. आम्ही देशाला नवा पंतप्रधान देऊ, असं अखिलेश म्हणाले.