येत्या लोकसभा निवडणुकीत माझ्यासमोर कोणीही टिकणार नाही, 2024ला पाहू- मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 12:47 PM2019-03-29T12:47:00+5:302019-03-29T12:47:25+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणूक 2019मध्ये भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए पुन्हा सत्तेत परतेल, अशी आशा व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनीलोकसभा निवडणूक 2019मध्ये भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए पुन्हा सत्तेत परतेल, अशी आशा व्यक्त केली आहे. रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. या निवडणुकीत एनडीए 300हून जास्त जागा जिंकून पुन्हा केंद्रात सत्ता स्थापन करेल. विरोधकांची गणितं सपशेल अपयशी ठरली आहेत. जनतेनं 30 वर्षांनंतर पूर्ण बहुमत असलेलं सरकार निवडलं आहे. जनतेला आता देश अस्थिरतेकडे घेऊन जायचा नाही. 2019च्या निवडणुकीत माझ्यासमोरही कोणीही टिकणार नाही.
2024मध्ये माझ्याविरोधात कोणी मैदानात असल्यास ते तेव्हा पाहू, असंही मोदी म्हणाले आहेत. काँग्रेसनं निवडणुकीत तरुणांना आश्वासनं देऊन फसवलं आहे. नेहरूसुद्धा गरिबांबद्दल बोलायचे, इंदिराही गरिबीचा मुद्दा उचलायच्या, राजीव हेसुद्धा गरिबीबद्दल बोलायचे, आता त्यांची पाचवी पिढीसुद्धा गरिबीचा मुद्दा उचलत आहे, अशी टीका मोदींनी राहुल गांधींवर केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात महाभियोग आणणारे, प्रसारमाध्यमांवर बंदी घालून त्यांची गळचेपी करणारे आणि आणीबाणी लावणाऱ्यांनी मला ज्ञान देण्याच्या भानगडीत पडू नये. महागठबंधनचं गणित थोड्याच दिवसांत कोलमडणार आहे. अर्ज भरल्यानंतर विरोधी पक्ष एकमेकांपासून आणखी विखुरले जातील. 2019मध्ये जेव्हा आमचं सरकार सत्तेवर येईल तेव्हा आम्ही विरोधी पक्षांनाही सोबत घेऊन जाऊ, असंही मोदी म्हणाले आहेत.
मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ''जे आपल्या देशाच्या पंतप्रधानावर संशय घेतात आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानाचे कौतुक करतात, त्यांना ओळखले पाहिजे. जेव्हा अभिनंदन प्रकरण घडले तेव्हा देशातील सर्व राजकीय पक्षांनी पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडणाऱ्या जवानाचा आम्हाला अभिमान आहे, असे एकजुटीने सांगण्याची गरज होती. मात्र ते सोडून या मंडळीने अभिनंदन परत कधी येईल, असा धोशा सुरू केला. त्या रात्री मेणबत्ती मोर्चा आणि पुलवामा हल्ल्याला राजकीय मुद्दा बवण्याची योजनाही त्यांनी आखली होती. मात्र त्याच दिवशी संध्याकाळच्या सुमारास पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी अभिनंदनच्या सुटकेची घोषणा केली. त्यामुळे विरोधकांचा डाव फसला.''