पंतप्रधान मोदींच्या विरोधात 'ते' नरेंद्र मोदी लढणार; वाराणसीत आव्हान देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 05:47 PM2019-04-13T17:47:49+5:302019-04-13T17:51:04+5:30
वाराणसीत मोदींविरोधात तमिळनाडूचे 111 शेतकरी, उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मैदानात
वाराणसी: लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचारयंत्रणा कामाला लागल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाही वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढणार आहेत. 26 एप्रिलला ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मोदींविरोधात तमिळनाडूचे 111 शेतकरी, बीएसएफचे माजी जवान, उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती यांच्यासह अनेक जण निवडणुकीला उभे राहणार आहेत. याशिवाय मोदींसारखेच दिसणारे अभिनंदन पाठकदेखील वारासणीतून उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
अभिनंदन पाठक 26 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पाठक वाराणसीसोबतच लखनऊमधूनही निवडणूक लढवणार आहेत. भाजपा जुमल्यांसाठी ओळखली जाते, अशी टीका पाठक यांनी केली. 'भाजपानं लोकांना अच्छे दिन आणण्याचं स्वप्न दाखवलं होतं. प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख रुपये आणण्याचं वचन दिलं. मात्र आता ते आता आम्हाला पकोडे तळायला सांगतात. ते अली विरुद्ध बजरंगबलीचे मुद्दे उपस्थित करतात,' अशा शब्दांमध्ये पाठक यांनी भाजपाचा समाचार घेतला.
मी जिंकण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचं पाठक यांनी सांगितलं. 'लोक पक्ष बाजूला ठेऊन मला मतदान करतील आणि भाजपाला उत्तर देतील,' असं पाठक म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपाच्या 'मैं भी चौकीदार' मोहिमेवर निशाणा साधला. जे लोक स्वत:ला चौकीदार म्हणवून घेतात. मात्र त्यांना गरिबी काय असते ते माहीत नाही, अशी टीका त्यांनी केली. ईश्वर आणि अल्ला एकच असल्याची प्रतिक्रिया त्यांनी अली आणि बजरंगबलीच्या मुद्द्यावर भाष्य करताना दिली. मला अली आणि बजरंगबली अशा दोघांचाही आशीर्वाद असल्याचं पाठक यांनी सांगितलं.