“९९ टक्के शिवसैनिकांना संजय राऊत खटकतात; लोकसभेचे खासदार त्यांना किंमत देत नाहीत”
By प्रविण मरगळे | Published: September 22, 2020 06:33 PM2020-09-22T18:33:54+5:302020-09-22T18:34:23+5:30
माजी खासदार निलेश राणेंची संजय राऊत यांच्यावर टीका
मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा माजी खासदार निलेश राणेंनी टीका केली आहे. शिवसेनेत ९९ टक्के लोकांना संजय राऊत खटकतात असा टोला त्यांनी ट्विटच्या माध्यमातून लगावला आहे. तसेच संजय राऊत यांना नेते किंमत देत नाहीत अशी बोचरी टीकाही निलेश राणेंनी केली आहे.
माजी खासदार निलेश राणेंनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आधी CAA नंतर कृषी बिल, दोन्ही वेळेला लोकसभेत समर्थन राज्यसभेत विरोध याचं कारण, शिवसेनेचे लोकसभेचे खासदार संज्या राऊतला किंमत देत नाही व नेता मानत नाही. संज्या ९९% शिवसैनिकांना खटकतो म्हणून संधी मिळेल तेव्हा ते संज्याला फाट्यावर मारतात आणि पक्ष भूमिका राहते बाजूला अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे. तर नाणार प्रकल्प व एमआयडीसी राजापूर या दोन्ही प्रकल्पांच्या जमीन घोटाळा प्रकरणी उद्या पत्रकार परिषद घेणार आहे. जमीन व्यवहारात मोठा भ्रष्टाचार कोण करतंय रत्नागिरी जिल्ह्यात हे नावासकट उद्या बाहेर काढणार असा इशाराही त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.
आधी CAA नंतर कृषी बिल, दोन्ही वेळेला लोकसभेत समर्थन राज्यसभेत विरोध याचं कारण, शिवसेनेचे लोकसभेचे खासदार संज्या राऊतला किंमत देत नाही व नेता मानत नाही. संज्या ९९% शिवसैनिकांना खटकतो म्हणून संधी मिळेल तेव्हा ते संज्याला फाट्यावर मारतात आणि पक्ष भूमिका राहते बाजूला.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 22, 2020
यापूर्वीही संजय राऊत यांनी कंगना आणि शिवसेना वाद तसेच महाराष्ट्राच्या राजकारणातील ठाकरे कुटंबाच्या महत्त्वाबाबत सामनामधून लिहिलेल्या रोखठोक लेखाला निलेश राणे यांनी ट्वटिवरवरून जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. आपल्या ट्विटमध्ये निलेश राणे म्हणाले की, संजय राऊत म्हणतात की, पवार आणि ठाकरे महाराष्ट्राचे ब्रँड आहेत. त्यांना सांगा जगात ब्रँडची निर्मिती वस्तू विकायला केली जाते. म्हणजे महाराष्ट्र विकला असं म्हणायचं का? महाराष्ट्राने अनेक लोकांना मोठं केलं. हे राज्य कुणाच्या बापाचं नाही. हे राज्य जनतेने मोठं केलं आहे. कुठल्या विकाऊ ब्रँडने नाही असं त्यांनी म्हटलं होतं.
तसेच संजय राऊतांसारखा भंगार माणूस कुणी नाही. कारण परिस्थिती अंगावर आली हे लक्षात आलं की, फक्त मराठी अमराठी वाद लावून द्यायचा की लोग आपोआप स्वत:ला वाटून घेतात आणि शिवसेनेचं काम सोपं होतं. मराठी माणसाने आतातरी यांची चाल ओळखावी आणि संधी मिळताच यांना आडवं करावं असा आरोपही निलेश राणेंनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर केला होता.
शिवसेना हा कन्फ्यूज पक्ष, दुटप्पी भूमिका घ्यायची सवय
शिवसेना हा एक कन्फ्यूज पक्ष आहे याचं कारण लोकसभेत त्यांची वेगळी भूमिका असते, राज्यसभेत त्यांची वेगळी भूमिका असते. पण यात नवल नाही त्यांना ही सवय आहे, आमच्यासोबत असताना ते सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही भूमिका बजावत होते. ते लोकसभेत वेगळे बोलतात, राज्यसभेत वेगळे बोलतात, पहिल्यांदा शिवसेनेने भूमिका ठरवली पाहिजे, शेतीसंदर्भात शिवसेनेने कधीच भूमिका मांडली नाही, राज्यात शिवसेनेची सत्ता आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या होणार नाहीत अशी ग्वाही संजय राऊत घेणार आहे का? निव्वळ राजकारण करु नका, शेतकऱ्यांबाबत शिवसेनेने भूमिका घ्यावी अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला फटकारलं होतं.