...तर हिटलरनेही आत्महत्या केली असती, ममतांनी साधला मोदींवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 04:49 PM2019-04-09T16:49:21+5:302019-04-09T16:50:00+5:30
लोकशाहीत प्रत्येकाला एकमेकांवर चिखलफेक करण्याचा अधिकार असतो.
नवी दिल्ली- लोकशाहीत प्रत्येकाला एकमेकांवर चिखलफेक करण्याचा अधिकार असतो. प्रचार रॅली आणि सभेदरम्यान नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. त्यातच अनेक नेते एकमेकांवर टीका करताना पातळीही सोडतात. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही मोदींवर निशाणा साधला आहे. त्या व्यक्तीचं राजकारण हे हिंसा आणि दंगलींनी रंगलेलं आहे. मोदी ज्या पद्धतीनं काम करतात, कदाचित ते पाहिल्यावर एडॉल्फ हिटलरनेही आत्महत्या केली असती, असंही ममता म्हणाल्या आहेत.
भाजपासारख्या देशातील सर्वात मोठ्या पक्षाशी लढण्याचा काँग्रेस दावा करत आहे. परंतु काँग्रेस मनोमन पराभूत झालेली आहे. मोदींचा सामना करण्याचा काँग्रेस नेत्यांमध्ये दम नाही. मोदी हे समाज सत्तावादीविरोधी असल्याचंही ममता म्हणाल्या आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत कोणालाही आवडत नाही. त्यांच्या भीतीपायीच भाजपामधला कोणताही नेता त्यांच्याविरोधात बोलत नाही. काँग्रेस पक्ष कमकुवत असल्यानंच भाजपा वाढत चालला आहे. राहुल गांधींना सरकार बनवण्यासाठी इतर पक्षांचा पाठिंबा लागणार आहे. त्यामुळे एकदा का मोदी सत्तेतून बाहेर गेले, तर नव्या भारताचं निर्माण करता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्ता व राजकारणातून हद्दपार करा तसेच त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावायला हवी, असे उद्गार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी सोमवारी काढले होते.
येथील प्रचारसभेत त्या म्हणाल्या होत्या, मोदी यांनी आपल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीतील साडेचार वर्षे विदेश दौरे करण्यातच घालविले. त्यांना देशातील शेतकरी, मध्यमवर्गाकडे लक्ष देण्यास अजिबात वेळ नव्हता. निवडणुका तोंडावर आल्यानंतर मोदी आता प्रत्येकाला धमकावत आहेत आणि सर्रास खोटा प्रचार करत आहेत. धडधडीत खोटे बोलण्याच्या स्पर्धेत मोदी नक्कीच प्रथम क्रमांक पटकावतील. त्या पुढे म्हणाल्या, मोदी यांनी खोटे बोलू नये म्हणून आता जनतेनेच त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावायला हवी. देशाच्या भल्यासाठी त्यांना केवळ पंतप्रधानपदावरूनच नव्हेतर, राजकारणातूनही हद्दपार करायला हवे.