पाच वर्षांत मुलायम सिंहांच्या संपत्तीत मोठी घट, अखिलेशकडून घेतलंय दोन कोटींचं कर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 06:44 PM2019-04-02T18:44:17+5:302019-04-02T18:44:58+5:30
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक नेत्यांनी उमेदवारी अर्जही भरले आहेत.
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक नेत्यांनी उमेदवारी अर्जही भरले आहेत. समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यांनीही उमेदवारी अर्ज भरला असून, प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. प्रतिज्ञापत्रात मुलायम सिंह यांच्या संपत्तीत मोठी घट झाल्याचं समोर आलं आहे. मुलायम सिंह यादव हे मैनपुरी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहे.
मुलायम सिंह यांनी काल अर्ज दाखल करताना 16 कोटी 52 लाख 44 हजार 300 रुपयांची संपत्ती जाहीर केली. 2014मध्ये सांगितलेल्या संपत्तीच्या आकड्यापेक्षा तीन कोटी 20 लाख 15 हजार 517 रुपये कमी आहेत. 2014च्या प्रतिज्ञापत्रात मुलायम सिंहांनी प्रतिज्ञापत्रात 19 कोटी 72 लाख 59 हजार 817 रुपयांची संपत्ती असल्याची माहिती दिली होती. मुलायम सिंह यांच्याविरोधात एक गुन्हाही दाखल आहे. त्यांनी प्रतिज्ञापत्रात या गुन्हाचा उल्लेखही केला आहे.
तसेच अखिलेश यादवकडून दोन कोटी 13 लाख 80 हजारांचं कर्ज घेतल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. मुलायम सिंहांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, 2017-18मध्ये 32 लाख 02 हजार 615 रुपये एकूण वार्षिक उत्पन्न दाखवलं होतं. तर त्यांच्या पत्नी साधना यादव यांचं उत्पन्न 25 लाख 61 हजार 170 रुपये दाखवण्यात आलं होतं. साधनाजवळ 5 कोटी सहा लाख 86 हजार 842 रुपयांची संपत्ती आहे. मुलायम सिंह यांच्याकडे कोणतीही कार नाही. परंतु त्यांच्या पत्नीकडे आलिशान कार आहे.