महाविकास आघाडीचे सरकार भांबावलेले- विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 07:38 AM2021-06-02T07:38:06+5:302021-06-02T07:38:46+5:30
पालघरमधील तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानीची केली पाहणी
पालघर/मनोर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार फक्त घोषणा करते, मात्र प्रत्यक्षात कृती होताना दिसत नाही. एकावर एक कोरोनाच्या लाटा येत असताना एक दिवसाच्या जन्मलेल्या मुलीला वेळेवर उपचार देण्यात हे सरकार अपयशी ठरल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पालघरमध्ये केली. तौक्ते चक्रीवादळाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर पालघर येथे आले होते. त्यावेळेस त्यांच्यासोबत खासदार गोपाल शेट्टी, आमदार मनीषा चौधरी, जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, सरचिटणीस सुजित पाटील, प्रशांत पाटील, समीर पाटील आदी उपस्थित होते.
कोरोनाबरोबर व्यापार-उदीम पण स्थिरस्थावर झाला पाहिजे. सगळ्या व्यापार व्यवसायांना चालना मिळण्यासाठी लॉकडाऊन शिथिल केले पाहिजे, अशी आमची मागणी होती. दुकाने संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उघडी ठेवणे अपेक्षित असताना, दुपारी १२ वाजेपर्यंत तर अन्य ठिकाणी २ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी दिली असती तर डबघाईला आलेल्या व्यवसायाला स्थिरावण्याची संधी मिळाली असती, असे दरेकर यांनी सांगितले.
सरकार फक्त घोषणा करते, कृती होताना दिसत नाही. पहिली लाट आली, दुसरी आली, तिसरी लाट येण्याची सूचना अगोदरच मिळाली आहे. काल पालघर येथे १२ तासाच्या मुलीला कोरोनाची लागण झाल्यामुळे तिला बराच वेळ ताटकळत फिरावे लागले. अखेर तिला पालघरपासून ६० किलोमीटर लांब असलेल्या जव्हार या ठिकाणी जावे लागले.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, आम्ही उपाययोजना करू, मात्र या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची यंत्रणा नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली. सरकारने नुकसानग्रस्तांसाठी जी मदत जाहीर केली आहे, ती तुटपुंजी आहे. साधारण ३५ ते ४० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे शासनाकडून सांगितले जाते, मात्र माझ्या माहितीप्रमाणे सुमारे २०० कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. यासाठी शासनाने तात्काळ मदत जाहीर करून नुकसानग्रस्तांना आधार द्यायला हवा, असेही दरेकर यांनी सांगितले.