.. म्हणून महादेव जानकर अस्वस्थ : पुण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 10:15 AM2019-03-23T10:15:34+5:302019-03-23T10:27:48+5:30
बारामती लोकसभा मतदारसंघात राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिल्याने अस्वस्थ असलेल्या महादेव जानकर यांनी आज पुण्यात रासपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आता ते काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिल्याने अस्वस्थ असलेल्या महादेव जानकर यांनी आज पुण्यात रासपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आता ते काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
२०१४पासून युतीच्या गोटात सामील झालेल्या जानकर यांना भाजपने कधीच हव्या तेवढ्या जागा आणि पदं दिलेली नसल्याचा रासपच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे. सुमारे तीन वर्ष रुसवे-फुगवे केल्यावर त्यांना दुग्धविकास मंत्री म्ह्णून कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. भाजपमधील पंकजा मुंडे गटाचे मानले जाणारे जानकर यांनी माढा, बारामती किंवा परभणी यापैकी एक जागा आम्हाला मिळावी अशी मागणी केली होती. अर्थात ही जागा मिळाली असली तरी ती त्यांना न मिळता कुल यांच्याकडे गेली आहे. मागील वेळी हक्काच्या बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळेंना जानकर यांनी धावपळ करण्याची वेळ आणली होती. त्यामुळे यावेळी तिथे उमेदवारी मिळावी अशी त्यांची इच्छा होती. मात्र ती डावलून मुख्यमंत्र्यांनी कुल यांना उमेदवारी दिली आहे. अर्थात यात फक्त जानकर यांचा बळी गेला नसून ते ज्या गटातून भाजपमध्ये टिकून आहेत त्यांनाही धडा शिकवल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे जानकर यांना स्वतःला नसली तरी रासपला एक जागा देण्यात आली आहे. त्यामुळे नेमक्या कुठल्या कारणाचा गवगवा करून नाराजी दाखवायची हेही त्यांना शोधावे लागेल. बाहेर रासपच्या मतदारांमध्ये विचारले असता धनगर की धनगड यात त्यांचे आरक्षणाचे घोंगडे भिजत असल्याने तिकडेही जानकर यांच्याविषयी नाराजी आहे. याच सगळ्या मुद्द्यांवर विचार करण्यासाठी आणि अर्थात ताकद आजमावण्यासाठी त्यांनी पुण्यात पक्षाचा मेळावा आणि बैठकीचे आयोजन केले आहे. त्यामुळे आता या बैठकीत काय निर्णय होतो हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
(ता.क. : मागील आठवड्यात पुण्यात राजू शेट्टी यांच्यासोबतच्या मैत्रीचे जाहीर प्रदर्शन करून जानकर यांनी तिसरा पर्यायही खुला ठेवल्याचे बोलले जात आहे )