Maharashtra Assembly election 2024: महायुतीत पहिली बंडखोरी! आभा पांडे यांनी पुर्व नागपुरातून भरला अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 05:08 PM2024-10-24T17:08:44+5:302024-10-24T17:10:06+5:30
Maharashtra Assembly election NCP: अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आभा पांडे यांनी बंडखोरी करत नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
योगेश पांडे, नागपूर
Mahayuti Maharashtra Assembly election 2024: महायुतीत सर्व काही आलबेल असून जागावाटपावरून काहीच नाराजी नाही, असा सूर राज्य पातळीवर नेत्यांकडून लावण्यात येत असला तरी प्रत्यक्षात तिकिटावरून नाराजीनाट्य सुरू झाले आहे. नागपुरात महायुतीतील पहिली बंडखोरी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्या व राज्य महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे यांनी केली आहे. त्यांनी गुरुवारी पुर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.
मागील तीन विधानसभा निवडणुकीत कृष्णा खोपडे हे पुर्व नागपुरातून विजयी झालेले आहेत. यावेळीदेखील भाजपने त्यांनाच उमेदवारी दिली आहे. जो उमेदवार जिंकू शकेल त्यालाच उमेदवारी मिळेल अशी भूमिका महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत मांडण्यात आली होती. मात्र नागपुरातूनच या भूमिकेला सुरूंग लागताना दिसतो आहे.
आभा पांडे निवडणूक लढवण्यावर ठाम
आभा पांडे यांनी काहीही झाले तरी पूर्व नागपुरातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. राष्ट्रवादीने तिकीट नाही दिले, तर जनतेसाठी मी अपक्ष म्हणून निवडणूक लढेन अशी भूमिका त्यांनी मांडली होती. राष्ट्रवादीचे नेते त्यांची मनधरणी करतील अशी चर्चा होती. मात्र गुरुवारी आभा पांडे यांनी त्यांच्या समर्थकांसोबत निवडणूक अर्ज दाखल केला. यामुळे पुर्व नागपुरात खोपडे यांना त्यांच्याच मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्याविरोधात लढावे लागणार आहे.
निवडणूक लढवण्याबद्दल आभा पांडे काय बोलल्या?
आभा पांडे यांना २०१७ साली झालेल्या मनपा निवडणूकीत जवळपास ११ हजार मते मिळाली होती. शिवाय त्यांच्या प्रभागातील अनेक बुथ पुर्व नागपुरात येतात. मी कृष्णा खोपडे यांच्या विरोधात निवडणूक लढवावी ही इथल्या स्थानिक जनतेची मागणी आहे. जनतेच्या मागणीवरूनच मी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचे पांडे यांनी सांगितले.
फटका कुणाला बसणार ?
महाविकासआघाडीकडून पुर्व नागपुरचा अधिकृत उमेदवार जाहीर झाला नसला तरी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) दुनेश्वर पेठे यांना पक्षाने एबी फॉर्म दिला आहे. पांडे व पेठे यांच्यातदेखील राजकीय वाद आहे. आता पांडे यांच्या अपक्ष उमेदवारीचा नेमका फटका कुणाला बसणार यावरून विविध कयास वर्तविण्यात येत आहे.