कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 07:27 PM2024-10-24T19:27:55+5:302024-10-24T19:30:19+5:30
Maharashtra Vidhan Sabha 2024: विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली. पहिल्या दोन दिवसांत अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या कमी होती. पण, गुरूवारी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले.
नितीन काळेल
सातारा : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखलच्या तिसऱ्या दिवशी १७ उमेदवारांनी २० उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये कोरेगाव मतदारसंघातून आमदार शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि कऱ्हाड दक्षिणमधून भाजपकडून डॉ. अतुल भोसले यांनी अर्ज दाखल केला आहे. तर पाटण, कऱ्हाड उत्तर, फलटण आणि वाई मतदारसंघासाठी गुरुवारी कोणीही अर्ज दाखल केलेला नाही.
विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली. पहिल्या दोन दिवसांत अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या कमी होती. पण, गुरूवारी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले.
विधानसभेच्या आठ मतदारसंघासाठी १७ उमेदवारांची २० नामनिर्देशनपत्रे दाखल झाली. माण मतदारसंघातून दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले. कऱ्हाड दक्षिणसाठी ६ उमेदवारांची ८ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली. तसेच सातारा विधानसभा निवडणुकीसाठी दोघांनी अर्ज दाखल केला आहे. कोरेगाव मतदारसंघासाठी ७ उमेदवारांची ८ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत.
माण विधानसभा मतदारसंघातून संदिप जनार्दन खरात आणि शिवाजीराव शामराव मोरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. कऱ्हाड दक्षिणसाठी भाजपकडून डॉ. अतुल भोसले आणि डॉ. सुरेश भोसले यांनी उमेदवारी दाखल केली.
तसेच याच मतदारसंघात अपक्ष म्हणून गोरख गणपती शिंदे, विश्वजीत अशोक पाटील, इंद्रजित अशोक गुजर, रविंद्र वसंतराव यादव यांनी अर्ज भरला आहे.
सातारा मतदारसंघासाठी वसंतराव मानकुमरे आणि राजेंद्र निवृत्ती कांबळे या दोघांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात जालिंदर शंकर गोडसे यांनी शिवसेना आणि अपक्ष म्हणून दोन अर्ज दाखल केले.
तसेच आमदार शशिकांत शिंदे आणि त्यांची पत्नी वैशाली शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे. तसेच अपक्ष म्हणून उद्धव आत्माराम कर्णे, ॲड. संतोष गणपत कमाने, सचिन सुभाष महाजन, उमेश भाऊ चव्हाण यांनी अर्ज भरला आहे.