महायुतीसमोर मताधिक्य राखण्याचे आव्हान, मविआची 'या' 11 मतदारसंघात काय होती स्थिती?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 06:32 PM2024-10-29T18:32:37+5:302024-10-29T18:34:51+5:30
Maharashtra Assembly election 2024 Jalgaon: जळगाव जिल्ह्यात विधानसभेच्या ११ जागा आहेत. सलग तीन लोकसभा निवडणुकीत युतीने या मतदारसंघात वर्चस्व राखले आहे, पण यावेळी विधानसभा निवडणुकीत या ११ मतदारसंघाचा निकाल काय असणार, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
अजय पाटील, जळगाव
Maharashtra Assembly election 2024: विधानसभेच्या तब्बल ११ जागा असलेल्या जळगाव जिल्ह्यातील राजकारणाकडे सगळ्याचे लक्ष आहे. एकनाथ खडसे यांच्यानंतर गिरीश महाजन यांनी जिल्ह्यात भाजप मजबूत केली असून, गेल्या तीन लोकसभा निवडणुकीत त्यांची प्रचिती निकालाच्या माध्यमातून आली आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीतही महायुतीने या ११ विधानसभा मतदारसंघात लाखांच्या वर मताधिक्य घेतले. महाविकास आघाडीची कामगिरी जेमतेम राहिली. त्यामुळेच यावेळी या ११ मतदारसंघात महायुतीला मताधिक्य कायम ठेवण्याचे, तर महाविकास आघाडीसमोर ते मताधिक्य पार करण्याचे आव्हान आहे.
काही महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या दोन्ही उमेदवारांना जिल्ह्यातील सर्व ११ विधानसभा मतदारसंघात मोठे मताधिक्य मिळाले होते.
लोकसभेला मताधिक्य विधानसभेला वेगळे चित्र
त्याच्याआधी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळीसुध्दा जळगाव व रावेर या दोन्ही मतदारसंघात भाजपचे उमेदवारच विजयी झाले होते. त्यावेळी चार महिन्यानंतरच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत रावेर, मुक्ताईनगर व अमळनेर या तीन मतदारसंघात मात्र महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला होता.
२०१४ मध्येदेखील लोकसभेच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांना सर्व ११ मतदारसंघांमध्ये मताधिक्य मिळाले होते. मात्र, त्यावेळच्या विधानसभेच्या निवडणुकीत चोपडा, जळगाव ग्रामीण, पाचोरा, एरंडोल, अमळनेर या मतदारसंघांमध्ये भाजपला लोकसभेचे मताधिक्य राखता आले नव्हते.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीला मोठे मताधिक्य मिळाले, ते महायुतीला कायम ठेवण्याचे आहे, तर महाविकास आघाडीला हे मताधिक्य कमी करण्याचे आव्हान आहे.
स्मिता पाटील यांना अडीच लाखांचं मताधिक्य
जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपने उन्मेश पाटील यांचं तिकीट कापत स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने करण पाटील यांना उमेदवारी दिली होती.
स्मिता वाघ यांना ६ लाख ७४ हजार ४२८ मते मिळाली होती. तर करण पाटील यांना ४ लाख २२ हजार ८३४ मते मिळाली होती. स्मिता वाघ यांचा २ लाख ५१ हजार ५९१ इतक्या मताधिक्याने विजय झाला होता.
रक्षा खडसेंना अडीच लाखांहून अधिक मताधिक्य
जळगाव जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला होता. रक्षा खडसे यांनी (६,३०,८७९ मते) श्रीराम पाटील (३,५८,६९६ मते) यांचा २ लाख ७२ हजार १८३ मतांनी पराभव केला होता.