Maharashtra Election 2024: मतविभाजनाचा फंडा 'सेम टू सेम', कुणाचा बिघडवणार 'गेम'!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 05:35 PM2024-11-10T17:35:55+5:302024-11-10T17:38:35+5:30
Maharashtra election 2024 buldhana politics: बुलढाणा जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात डमी उमेदवारांमुळे मतविभाजनाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
दिनेश पठाडे, बुलढाणा
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत एकसारखे नाव आणि चिन्ह असलेल्या अपक्ष उमेदवारांनी बक्कळ मते घेतल्याचे समोर आले होते. तोच कित्ता विधानसभा निवडणुकीतही गिरवला जात आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील एकूण उमेदवारांपैकी तीन प्रमुख उमेदवारांचे नाव आणि अडनाव 'सेम टू सेम' असलेले इतर तीन अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तसेच नाव एकसारखेच पण आडनावात थोडासा बदल असलेले दोन अपक्षही रिंगणात आहेत.
नावसाधर्म्य असलेले उमेदवार प्रमुख उमेदवारांचा गेम बिघडवतात, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. निवडणुकीच्या रणसंग्रामात प्रतिस्पर्थ्यांना चीतपट करण्यासाठी प्रमुख पक्ष आणि उमेदवारांकडून वेगवेगळे डावपेच आखले जातात. विरोधी उमेदवारांचे मतविभाजन कसे होईल, यावर लक्ष केंद्रित केले जाते. 'सेम टू सेम' नावाचा डमी उमेदवार उभा करून
मतविभाजन करण्याचा फंड राजकारणात वापरला जात आहे. लोकसभा निवडणुकीत नाव आणि चिन्ह एकसारखे असलेल्या उमेदवारांमुळे आमच्या उमेदवारांचा पराभव झाल्याचा आरोप करण्यात आला होता. अपक्ष उमेदवारांनी अनपेक्षितपणे मोठ्या प्रमाणात मते घेतल्याने लोकसभेत काही मतदारसंघात मतविभाजन झाले होते.
विधानसभेत देखील नावसाधर्म्य असलेले उमेदवार रिंगणात असल्याने हे अपक्ष उमेदवार किती मते घेतात, याची चर्चा रंगू लागली आहे. बुलढाणा जिल्ह्यात सात मतदारसंघ असून त्यापैकी बुलढाणा, चिखली, मेहकर येथील महाविकास आघाडीचे उमेदवारांप्रमाणेच नाव आणि अडनाव 'सेम टू सेम' असलेले इतर तीन अपक्ष उमेदवार उभे ठाकले आहेत, तर मेहकर मतदारसंघातील शिंदेसेनेचे उमेदवार संजय रायमुलकर यांच्या नावाप्रमाणेच नाव असलेले संजय कळसकर हे बीएसपीचे उमेदवार आहेत. मात्र, त्यांच्या अडनावात काहीसा बदल आहे.
मतदारांमध्ये होऊ शकतो गोंधळ तीन मतदारसंघात एकाच नावाचे काही उमेदवार उभे आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होऊन मतांची मोठी फाटाफूट होण्याची शक्यता आहे. चिखली, मेहकर, बुलढाणा मतदारसंघांत एकाच नावाचे, आडनावाचे उमेदवार उभे राहिल्याने याचा प्रमुख उमेदवारांना कितपत फटका बसू शकतो, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.