Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 09:46 PM2024-10-19T21:46:27+5:302024-10-19T21:50:55+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अमित शाह यांच्यासोबतची बैठक झाल्यानंतर नागपूरमध्ये परतलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नितीन गडकरी यांची भेट घेतली.
कमलेश वानखेडे
नागपूर : महायुतीचे जागावाटप (Mahayuti Seat Sharing) अंतिम टप्प्यात असून, लवकरच भाजपची पहिली उमेदवार यादी (BJP Candidate First List) जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी (19 ऑक्टोबर) रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (ChandraShekhar Bawankule) हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या निवासस्थानी पोहचले. सुमारे दोन तास या तीनही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
फडणवीसांची गडकरींसोबत काय झाली चर्चा?
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चर्चेत विदर्भातील जागा वाटपासह उमेदवारांच्या नावांवर गडकरींची सहमती घेण्याचे प्रयत्न झाले. नागपूर जिल्ह्यासह विदर्भातील बहुतांश जागांवर गडकरींचा पगडा आहे. शिवाय गडकरींना मानणारा वर्गही मोठा आहे. त्यामुळे येथील जागांसह उमेदवारांबाबत गडकरींचे मत काय आहे, हे जाणून घेण्यासाठी फडणवीस व बावनकुळे यांनी अंतिम चर्चा केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू असताना भाजपचे विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर हे देखील गडकरींच्या घरी पोहचले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उमेदवारांच्या नावाबाबत गडकरींनी दोन्ही नेत्यांना काही जागांवर महत्वपूर्ण सूचनाही केल्याची माहिती आहे.
रामटेकचे भाजप पदाधिकारी देवगिरीवर
रामटेकमध्ये आमदार आशिष जयस्वाल हे महायुतीचे उमेदवार असतील, अशी घोषणा केल्यानंतर भाजपाचे माजी आमदार डी. मल्लिकार्जून रेड्डी यांनी बंड पुकारले आहे. भाजपाने तडकाफडकी कारवाई करीत रेड्डी यांना निलंबित केले.
या कारवाईमुळे नाराज झालेल्या भाजपा पदाधिकाऱ्यांनी मेळावा घेत सामूहिक राजीनामे दिले. या सर्व नाराज पदाधिकाऱ्यांना शनिवारी (१९ ऑक्टोबर) रात्री देवगिरीवर बोलावण्यात आले. उपमुख्य देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची समजूत काढली व महायुतीला साथ देण्याची सूचना केली.