"दोन दिवसांत हादरे देणारी पत्रकार परिषद घेणार, मोठा गौप्यस्फोट करणार", चंद्रकांत पाटलांचा दावा
By बाळकृष्ण परब | Published: January 18, 2021 06:58 PM2021-01-18T18:58:01+5:302021-01-18T19:03:51+5:30
Maharashtra Gram Panchayat Election Results : चंद्रकांत पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघांतील गैरप्रकारांबाबत मोठा दावा केला आहे.
मुंबई - राज्यातील सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आता जवळपास स्पष्ट होऊ लागले आहेत. या निवडणुकीत भाजपाच सर्वाच मोठा पक्ष ठरला असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला असून, उद्या दुपारपर्यंत याबाबतची सविस्तर आकडेवारी दिली जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच चंद्रकांत पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघांतील गैरप्रकारांबाबत मोठा दावा केला आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. ते म्हणाले की, पदवीधर निडणुकीत महाविकास आघाडीने गैरप्रकार केले. या निवडणुकीतील गैरप्रकारांचा उलगडा करणारी मोठे हादरे देणारी पत्रकार परिषद मी येत्या दोन दिवसांत घेणार आहे. या निवडणुकीत मोठे गौप्यस्फोट करणार आहे. पदवीधर निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार घडले. काही ठिकाणी एकाच व्यक्तीची नावे मतदार यादीत अनेकदा आलेली होती. काही ठिकाणी कोऱ्या मतपत्रिका आल्या, असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचं वर्चस्व दिसून आलं आहे. या निवडणुकीनंतर सुमारे सहा हजार ग्रामपंचायतीत भाजपाचेच सरपंच बसतील, असा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. अनेक जिल्ह्यांमध्ये भाजपाला चांगलं यश मिळालं. आतापर्यंत २ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये भाजपाचं वर्चस्व दिसून आलं आहे. तर ५६४ बिनविरोध ग्रामपंचायतींमध्ये भाजपाची सत्ता आली आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला.