"राज्यातील सहा हजारपेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये कमळ फुलेल", भाजपा नेत्याचा दावा
By बाळकृष्ण परब | Published: January 18, 2021 01:47 PM2021-01-18T13:47:36+5:302021-01-18T13:51:21+5:30
Maharashtra Gram Panchayat Election Results Update : ग्रामपंचायतीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये कडवी टक्कर दिसून येत आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीही ग्रामीण भागातील आपला जनाधार कायम राखताना दिसत आहे.
मुंबई - राज्यातील सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये कडवी टक्कर दिसून येत आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीही ग्रामीण भागातील आपला जनाधार कायम राखताना दिसत आहे. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीचे संपूर्ण निकाल हाती येण्यात बराच अवधी लागण्याची शक्यता असताना भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्यातील ग्रामपंचायत निकालांबाबत मोठे भाकित केले आहे.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आता जी आकडेवारी समोर येते. काही ठिकाणी मतमोजणी सुरू आहे त्यामध्ये भाजपा चांगली कामगिरी करत असून, १४ हजारांपैकी सुमारे सहा हजार ग्रामपंचायतींवर भाजपाला यश मिळेल, संध्याकाळपर्यंत हा आकडा वाढेल, असा दावा केशव उपाध्य यांनी केला आहे. दरम्यान, या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने साम-दाम-दंड-भेद या सर्वांचा वापर केला, असा आरोप केशव उपाध्ये यांनी केला.
यावेळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणातील निकालांचा केशव उपाध्ये यांनी आवर्जुन उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, कोकण म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला मानले जाते. मात्र या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला चांगले मतदान झालेले दिसत आहे. उदाहरणच द्यायचं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायती भाजपाने जिंकल्या आहेत. अगदी शिवसेनेच्या खासदारांनी दत्तक घेतलेल्या गावामध्येही भाजपाने विजय मिळवला आहे, देवगड, वैभववाडी, मालवण आदी तालुक्यात अनेक ग्रामपंचायतींमध्ये भाजपाचा विजय झाला आहे, अशी माहिती केशव उपाध्ये यांनी दिली.
मात्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूरमधील गावात झालेल्या भाजपाच्या पराभवाबाबत विचारले असता उपाध्ये यांनी पाटील यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. चंद्रकांत पाटी हे राज्याचे नेते आहेत. त्यांना संपूर्ण राज्याकडे लक्ष द्यावे लागते, असे ते म्हणाले.