Maharashtra Gram Panchayat: राज्यातील पहिला निकाल लागला! कोल्हापुरात श्री'गणेशा' करत भाजपाने खाते खोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 09:14 AM2021-01-18T09:14:11+5:302021-01-18T09:15:53+5:30
Gram Panchayat Election Result: ग्राम पंचायत निवडणूक म्हणजे मिनी विधानसभा निवडणूकच असते. अनेक ठिकाणी पक्ष नाही तर पक्ष पुरस्कृत गाव पॅनेल उभारलेले असते. यामुळे ही निवडणूक थेट पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नाही.
राज्यातील १४ हजार ग्राम पंचायत निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे. मतमोजणी सुरु झाली असून पहिला निकालही हाती आला आहे. कोल्हापूरमधील गणेशवाडी ग्राम पंचायतीचा निकाल जाहीर झाला असून ही ग्रा.पं. भाजपाने जिंकली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामध्ये ही ग्राम पंचायत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ३८६ ग्रामपंचायतींसाठी आज, सोमवारी तालुक्यांच्या ठिकाणी मतमोजणी होत आहे. अत्यंत अटीतटीने निवडणूक झाली असून ३,३०७ जागांसाठी तब्बल ७,६५७ उमेदवार रिंगणात होते. उमेदवारांसह समर्थकांच्या नजरा आजच्या मतमोजणीकडे लागल्या आहेत. जिल्ह्यात ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या. त्यातील ४७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित ३८६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. १५) मतदान झाले. चुरशीने ८३.८० टक्के मतदान झाले होते. उमेदवारांचे गेले दोन दिवस विजयाची गणिते मांडण्यात गेले आहेत. आता निकालाचा दिवस आल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
सर्वसाधारणपणे मोठ्या गावांसाठी सहा टेबलवर मोजणी होणार असून अर्ध्या तासात गावची मतमोजणी पूर्ण होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यात पावणेनऊ वाजल्यापासूनच फटाके व गुलालाची उधळण सुरू होणार आहे. करवीर तालुक्यातील ग्रामपंचायतींची मतमोजणी रमणमळ्यात होणार असल्याने कसबा बावडा मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
मिरवणूक काढल्यास थेट गुन्हे
ग्रामपंचायतींच्या निकालानंतर विजयी उमेदवारांचा जल्लोष असणार आहे; मात्र गावातून मिरवणूक काढल्यास संबधितांवर थेट गुन्हे दाखल करण्याची तयारी पोलीस प्रशासनाने केली आहे. त्यामुळे विजयाचा आनंद काहीसा संयमानेच घ्यावा लागणार आहे.
आतापर्यंत हाती आलेले निकाल....
माळशिरस तालुक्यातील तीन ग्रामपंचायती विजयसिंह मोहिते-पाटील गटाचा विजय, तर एका ठिकाणी विजयसिंह मोहिते-पाटील आणि धवलसिंह मोहिते-पाटील दोघांच्याही समान जागा
सातारा जिल्ह्यातील कराडमधील खुबी ग्रामपंचायत भाजपने जिंकली, खालकरवाडी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा
हातकणंगले - जनसुराज्य पक्षाचा विजय