Flood: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये माणुसकी आहे का? राज्याला ड्रायव्हर नको; केंद्रीय मंत्री नारायण राणे संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 12:13 PM2021-07-23T12:13:12+5:302021-07-23T12:17:58+5:30
Ratnagiri, Raigad, Chiplun Flood: रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांची बोलून मी केंद्रीय मंत्र्यांशी संवाद साधला आहे. त्यांच्याकडून माहिती घेऊन केंद्राला कळवलं आहे. केंद्राकडून जास्तीत जास्त मदत करणार असल्याचं त्यांनी सांगितले.
मुंबई – राज्यात रत्नागिरी, रायगडसह संपूर्ण कोकणाला पुराचा मोठा फटका बसला आहे. १०-१२ फूट पाणी साचल्यानं अनेक शहरांशी संपर्क तुटला आहे. अनेकांची घरं पाण्याखाली गेली आहेत. लोकांना वाचवण्यासाठी रेस्क्यू टीम कार्यरत आहेत. केंद्राकडून आवश्यक ती मदत कोकणाला पुरवण्यात येत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांची बोलून मी केंद्रीय मंत्र्यांशी संवाद साधला आहे. केंद्र सरकार आवश्यक ती मदत करेल अशी माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी दिली आहे.
नारायण राणे पत्रकारांना म्हणाले की, अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती कोकणात निर्माण झाली आहे. ३५० मिली पाऊस पडलेला आहे. याठिकाणी हेलिकॉप्टर, बोटीच्या सहाय्याने लोकांना वाचवणं गरजेचे आहे. लोकांना अन्नपुरवठा करणं, सुरक्षितस्थळी नेणं गरजेचे आहे. केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्याशी बोललेलो आहे. हेलिकॉप्टर, बोटी, सैन्याची मदत केंद्राकडून करण्यात येत आहे. संबंधित मंत्र्यांशी माझं बोलणं झालं आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांची बोलून मी केंद्रीय मंत्र्यांशी संवाद साधला आहे. त्यांच्याकडून माहिती घेऊन केंद्राला कळवलं आहे. केंद्राकडून जास्तीत जास्त मदत करणार असल्याचं त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांमध्ये माणुसकी आहे का?
४८ तासांत कोकणात इतका पाऊस पडला आहे. राज्य सरकारला कुठल्याही गोष्टीचं गांभीर्य नाही. अतिवृष्टीमुळे कोकणातील लोकांची जीव धोक्यात येतो. राज्य सरकारकडून उपाययोजना होणं गरजेचे होते. मुख्यमंत्र्यांना माणुसकी आहे का? गाडी चालवत पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले. परंतु चेंबूर, विक्रोळीला अतिवृष्टीनं घरं कोसळली, जे मृत पावलेले त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी गेले नाहीत? राज्याला ड्रायव्हर नको, लोकांचा हित करणारा मुख्यमंत्री हवा. ड्रायव्हर शासनाकडे हजारो आहेत. गाडी चालवायची असेल तर कॅबिनेटला जा, मंत्रालयात जाऊन काम करा. राज्यात अतिशय गंभीर परिस्थिती आहे. विकास ठप्प आहे अशा शब्दात नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर(CM Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे.
कोकणात पुराचा हाहाकार
आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार तिलारी नदी धोका पातळीला पोचली असून कर्ली आणि वाघोटन नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 43.600 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 10 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 9.600 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे.