Maharashtra Vidhan Sabha: गांज्यापासून मांज्यापर्यंत! मुख्यमंत्र्यांनी सांगितली 'नारायण भंडारी' गोष्ट; सभागृहात एकच गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 04:23 PM2021-03-03T16:23:03+5:302021-03-03T16:41:08+5:30
CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha: राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्री आक्रमक; भाजपचा समाचार
मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला आहे. भाजपच्या प्रमुख नेत्यांचा मुख्यमंत्र्यांनी जोरदार समाचार घेतला आहे. कोरोना, हिंदुत्व, स्वातंत्र्यवीर सावरकर, औरंगाबादचं नामांतर यासारख्या अनेक विषयांवरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका केली. विरोधकांची चर्चा पाहून मला नटसम्राट पाहिल्याचा भास झाल्याचं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला. (CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha)
टीम इंडिया आता प्रत्येक सामना जिंकणार, कारण स्टेडियमचं नाव बदललंय; उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला
राज्यपाल कोश्यारींनी राज्य सरकारच्या कामगिरीची माहिती त्यांच्या अभिभाषणातून दिली. त्यांनी सरकारचं कौतुक केलं. ते पचवणं अनेकांना जड गेलं. कारण ते कौतुक अनपेक्षित होतं. राज्यपाल म्हणजे व्यक्ती नाही, ती संस्था आहे, असं विरोधक म्हणतात. त्यामुळेच त्यांचं भाषण महत्त्वाचं आहे. राज्यपाल मराठीत बोलले हेही नसे थोडके, असं मुख्यमंत्री म्हणाले. मी कोरोना काळातला सगळा हिशोब देतो. तुम्ही केंद्राकडून पीएम केअर्सचा हिशोब मागणार का, असा सवाल त्यांनी विरोधकांनी विचारला. तुम्हा माझ्याकडे हिशोब मागू शकता. पण पीएम केअर्सची माहिती आरटीआयमध्येही येत नाही आणि काही विचारलं तर तो देशद्रोह ठरतो. ही यांची लोकशाही, असा टोला त्यांनी लगावला.
"...तेव्हा नटसम्राट पाहत असल्याचा भास झाला," उद्धव ठाकरेंचा सुधीर मुनगंटीवारांना टोला
मुख्यमंत्र्यांनी सांगितली 'नारायण भंडारी'ची गोष्ट
विरोधकांकडे पाहत आज मी तुम्हाला नारायण भंडारीची गोष्ट सांगणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 'तुम्ही मला एका नारायण भंडारीची गोष्ट सांगितली. तोच नारायण भंडारी पुढे मोठा होतो. गाव सोडून जातो. मोठा माणूस होतो आणि एकदा स्वत:च्या गाडीनं गावाला येतो. तो गुरुजींच्या भेटीला जातो. मला ओळखलं का असं विचारतो. गुरुजी त्याचं कौतुक करतात. टीव्हीवर तुला रोज पाहतो म्हणतात. गांजापासून पतंगाच्या मांजापर्यंत आणि जमिनीतल्या पाण्यापासून मंगळावरच्या पाण्यापर्यंत बोलणाऱ्या नारायणचं कौतुक करतात,' अशी गोष्ट मुख्यमंत्र्यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला.
फडणवीसांना मुख्यमंत्र्यांचा टोला, कोरोना व्हायरस म्हणाला, 'मी पुन्हा येईन'...
मी तरी तुला हे सगळं शिकवलं नाही. मग तू हे कोणाकडू शिकलास, अशी विचारणा गुरुजी करतात. त्यावर मी गुरुच बदलला. मी ज्या क्षेत्रात काम करतो, त्या ठिकाणी असंच रेटून बोलावं लागत असल्याचं नारायण सांगतो. गुरुजी नारायणला जेवायला थांबण्यास सांगतात. पण नारायण म्हणतो, मला एक पत्रकार परिषद घ्यायची आहे. आता कोविड रुग्णालयात भ्रष्टाचार बाहेर काढणारी पत्रकार परिषद घेऊन आलो. आता दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी दुसरी पत्रकार परिषद घ्यायची असल्याचं नारायण गुरुजींना सांगतो आणि त्यांचा निरोप घेतो, अशी कथा मुख्यमंत्र्यांनी सांगितली. त्यानंतर विधानसभेत एकच गदारोळ झाला. त्यानंतर शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांनी सगळ्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं.