विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 07:03 PM2024-10-21T19:03:00+5:302024-10-21T19:13:20+5:30
Vile Parle Assembly candidates: भाजपाने पराग अळवणी यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून इच्छुक असलेल्या दीपक सावंत यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे.
मनोहर कुंभेजकर, मुंबई
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपाची काल पहिली यादी जाहीर झाली. या यादीत सलग तिसऱ्यांदा आमदार अँड.पराग अळवणी तिकीट दिले. त्यामुळे आपण येथून इच्छुक असताना अळवणी यांना तिकीट दिल्याने माजी आरोग्य मंत्री व शिंदे सेनेचे उपनेते डॉ.दीपक सावंत नाराज झाले आहेत.आपण आपली मानसिक तयारी केली असून, अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहे. लवकरच आपला निवडणूक अर्ज सादर करणार असल्याचे त्यांनी 'लोकमत'ला सांगितले.
जे.पी. नड्डांकडे केली होती जागेची मागणी
डॉ.दीपक सावंत यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत विलेपार्ले विधानसभा मतदार संघाची जागा शिंदे सेनेला मिळावी अशी मागणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या कडे त्यांच्या मुंबई भेटीत केली होती.
३० जून २०२४ रोजी झालेल्या विधानपरिषदेच्या पदवीधर निवडणुकीत ही जागा शिंदे सेनेची असतांना अखेरच्या क्षणी पदवीधर निवडणुकीसाठीचा आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला केली होती आणि तुमचे राजकीय पुनर्वसन करु असे आश्वासन भल्या पहाटे आपल्याला दिले होते.त्यामुळे त्याबदल्यात आता ही जागा शिंदे सेनेला सोडण्यात यावी अशी आपली मागणी होती.मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
विलेपार्ले मतदार संघात निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छुक असून, यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून आपल्याला अपक्ष लढण्याची परवानगी द्यावी असे त्यांना पत्र देखिल दिले होते असे त्यांनी सांगितले.
शिवसेनाप्रमुखांची इच्छा होती
माजी आमदार डॉ.रमेश प्रभू यांच्या नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपण निवडणुक लढावी, अशी शिवसेनाप्रमुखांची इच्छा होती,पण येन केन कारणाने आपल्याला पार्ल्यातून तिकीट नाकारण्यात आले व आपले तीन वेळा आमदार म्हणून विधानपरिषतून पुनर्वसन करण्यात आले.मात्र पार्ल्याचा शैक्षणिक,सांस्कृतिक विकास करण्यासाठी ही विधानसभा निवडणूक लढण्याची आपली मनापासून इच्छा असल्याने आपण ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याचे डॉ.दीपक सावंत यांनी सांगितले.
गेली ४० वर्षे या परिसरात शालेय जीवन, कॅालेज जीवन, वैद्यकीय व्यवसाय तसेच लायन्स,जायन्टस्,रोटरी मधे काम केले आहे, पार्ले टिळक, मिठीबाई, लोकमान्य सेवा संघ, उत्कर्ष मंडळ,साठ्ये महाविद्यालय ,जैन समाज , व्यापारी संघ अशा अनेक संस्थांशी आपला जवळचा संबंध आहे, त्यामुळे आपण येथून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.