पंकजा मुंडेंच्या समर्थनासाठी कार्यालयाबाहेर गर्दी करणाऱ्यांवर मोठी कारवाई, आयोजकांसह ४३ नेते आणि १२० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 07:27 PM2021-07-14T19:27:43+5:302021-07-14T19:28:31+5:30
Pankaja Munde: कोरोनाचा प्रादुर्भाव असताना सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजकांसह येथे जमलेल्या ४३ राजकीय नेते मंडळीसह १०० ते १२० कार्यकर्त्यांविरुद्ध वरळी पोलीस ठाण्यात मंगळवाऱी रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडे यांची वर्णी न लागल्यामुळे नाराज झालेले मुंडे समर्थक मंगळवाऱी मुंबईत धडकले. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या वरळीतील कार्यालयासमोर घोषणाबाजी करत येथे बैठक आयोजित करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव असताना सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजकांसह येथे जमलेल्या ४३ राजकीय नेते मंडळीसह १०० ते १२० कार्यकर्त्यांविरुद्ध वरळी पोलीस ठाण्यात मंगळवाऱी रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वरळी पोलीस अधिक तपास करत आहेत. (Major action taken against those who crowded outside the office in support of Pankaja Munde, 43 leaders including organizers and 120 activists charged)
पंकजा मुंडे यांच्या वरळी येथील निवासस्थान असलेल्या सुखदा इमारतीतील गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान संपर्क कार्यालयाबाहेर बीड, बुलडाणा, जळगाव, शिरुर, अहमदनगर अशा विविध भागातून अनेक कार्यकर्ते, राजकीय नेते येथे दाखल झाले होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी भाषण करत आपली भूमिका मांडली.
यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव असताना लागू करण्यात आलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. शिवाय सोशल डिस्टसिंगचे नियम न पाळता विनामास्क सभा आयोजित केली. तसेच त्याठिकाणी उपस्थित राहिले म्हणून वरळी पोलीस पोलीस उपनिरिक्षक प्रदीप सोनावणे यांच्या फिर्यादीवरुन वरळी पोलिसांनी कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यात ४३ राजकीय नेते मंडळीसह १०० ते १२० कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यापैकी १७ जणांना ताब्यात घेत नोटीस देत सोडून देण्यात आले आहेत. आयोजक तसेच सभेत उपस्थित असलेल्या सर्वाविरोधात हा गुन्हा दाखल असल्याचे वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल कोळी यांनी सांगितले. त्यानुसार तपास सुरु असल्याचेही त्यांनी नमूद केले.