पाकिस्तानवरील हल्ला, राष्ट्रवाद हे असणार भाजपाच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 04:41 AM2019-03-06T04:41:14+5:302019-03-06T04:41:38+5:30
आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोग ८ मार्च रोजी जाहीर करणार असल्याची चर्चा आहे.
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोग ८ मार्च रोजी जाहीर करणार असल्याची चर्चा आहे. हे लक्षात घेऊन भाजपा आपल्या निवडणूक रणनीतीला अंतिम स्वरुप देण्यात व्यग्र आहे. पुलवामा हल्ल्याला सडेतोड उत्तर म्हणून भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला व राष्ट्रवाद हे भाजपाच्या प्रचाराचे दोन प्रमुख मुद्दे असण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, राष्ट्रवाद या विषयावर एक प्रेरक गीत भाजपाच्या प्रचारमोहिमेसाठी प्रसून जोशी लिहीत आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत ‘सौगंध मुझे इस मिट्टी की मै देश नही मिटने दूंगा' हे गीत भाजपा व मोदींच्या प्रचारासाठी खास तयार करण्यात आले होते. त्याच्याच धर्तीवर आगामी लोकसभा निवडणुकांसाठीही प्रचारगीते लिहून घेण्यात येत आहेत. त्या प्रचारगीतांच्या व्हिडिओफितींमध्ये मोदींच्या भाषणांच्या दृश्यांचीही पेरणी केलेली असेल. पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने हल्ले चढविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची राजस्थानातील चुरू येथे जी सभा झाली त्यात त्यांनी ‘सौंगध मुझे इस मिट्टी की' या गाण्याच्या काही ओळी म्हणून दाखविल्या होत्या. देश सुरक्षित हातांमध्ये आहे याची खात्री बाळगा असे पंतप्रधान या सभेत म्हणाले होते.
>मोदी है तो
मुमकीन है...
‘नामुमकीन अब मुमकीन है' अशी घोषणा भाजपाने याआधी प्रचलित केली होती. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी ‘मोदी है तो मुमकीन है' अशी घोषणाही पक्षातर्फे दिली जाण्याची शक्यता आहे. भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यात किती दहशतवादी ठार झाले याचा आकडा मोदी सरकारने करावा अशी भाजपाचा मित्रपक्ष शिवसेना व इतर विरोधी पक्षांनी केलेली मागणी सरकारने मान्य केली नाही. बालाकोट हल्ल्यात किती जण मारले गेले असावेत याविषयी काहीही भाष्य करण्यास भारतीय हवाई दलाच्या प्रमुखांनी नकार दिला आहे.या हल्ल्यात २०० ते ४०० दहशतवादी ठार झाले असावेत अशी माहिती केंद्र सरकारमधील मंत्री खासगीत देत आहेत. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी २५० दहशतवादी ठार झाल्याचे जाहीर विधान केले होते. त्यामुळे बालाकोट हल्ल्यात पाकिस्तानची नेमकी किती हानी झाली याबाबत गुढ निर्माण झाले आहे. त्या मुद्द्याचा वापर विरोधी पक्षांकडून निवडणूक प्रचारात होण्याची शक्यता आहे.