सायन सर्कल परिसरातील भाजपाच्या आंदोलनावर पोलिसांची मोठी कारवाई, नेते, कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 06:22 PM2021-03-21T18:22:02+5:302021-03-21T18:45:35+5:30
police action on BJP agitation in Sion Circle area : अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी चित्रा वाघ आणि प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांकडून आंदोलन सुरू होते.
मुंबई - परमबीर सिंह यांनी पत्रामधून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या गंभीर आरोपांमुळे राज्य सरकार अडचणीत आले आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाने कमालीचा आक्रमक भूमिका घेतली आहे. आज मुंबईसह राज्यातील विविध भागांत भाजपाच्या नेत्यांनी जोरदार आंदोलने केली. दरम्यान, मुंबईतील सायन सर्कल परिसरात आंदोलन करणाऱ्या भाजपा नेत्या चित्रा वाघ आणि प्रसाद लाड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (police action on BJP agitation in Sion Circle area, leaders and activists arrested)
अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी चित्रा वाघ आणि प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांकडून आंदोलन सुरू होते. दरम्यान, पोलिसांनी या आंदोलकांवर कारवाई करत भाजपा नेत्या चित्रा वाघ, प्रसाद लाड यांच्यासह भाजपाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि हे आंदोलन पांगवले.
दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश दिले होते, असा धक्कादायक खुलासा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. ही राज्याच्या दृष्टीने अत्यंत शरमेची व भयावह बाब असून यासंदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अनिल देशमुख यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा व या संदर्भात स्वतः खुलासा करावा, या मागणीसाठी आज मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने दादर रेल्वे स्थानकाबाहेर तीव्र आंदोलन करण्यात आले. त्यानंतर मुंबई भाजपा अध्यक्ष आ. मंगलप्रभात लोढा, भाजपा मुंबई प्रभारी आ. अतुल भातखळकर, आ. योगेश सागर, आ. राम कदम, आ. पराग अळवणी, आ. सुनील राणे, आ. मिहीर कोटेचा, आ. पराग शहा यांच्यासह अनेक नेत्यांना व कार्यकर्त्यांना अटक केली.