नव्या सरकारच्या पहिल्या १०० दिवसांचा कार्यक्रम नक्की करा - मोदींच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 03:47 AM2019-04-16T03:47:10+5:302019-04-16T03:47:55+5:30
नव्या सरकारचा पहिल्या १00 दिवसांचा कार्यक्रम तयार करण्याचे आदेश पंतप्रधान कार्यालय, निती आयोग व मुख्य वैज्ञानिक सल्लागार विज्ञान सल्लागार यांना दिले आहेत.
नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकांचे २३ मे रोजी निकाल लागल्यानंतर आपणच पुन्हा सत्तेवर येणार असा आत्मविश्वास असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या सरकारचा पहिल्या १00 दिवसांचा कार्यक्रम तयार करण्याचे आदेश पंतप्रधान कार्यालय, निती आयोग व मुख्य वैज्ञानिक सल्लागार विज्ञान सल्लागार यांना दिले आहेत. पुढील पाच वर्षांत राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा विकास दर (जीडीपी) दोन अंकी व्हावा, असे लक्ष्य ठेवूनच हा कार्यक्रम तयार केला जाईल.
प्रचाराची रणधुमाळीत व्यस्त असताना मोदी यांनी स्वच्छ भारत योजनेच्या धर्तीवर आर्थिक व प्रशासकीय सुधारणा सुचविणारा कार्यक्रम तयार करण्याचे आदेश पंतप्रधान कार्यालय, निती आयोगाचे उपाध्यक्ष, मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रा. के. विजयराघवन यांना दिले आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, २०४७ सालपर्यंत भारताला विकसित देश बनविण्याकरिता पाया मजबूत करण्यासाठी तेल व नैसर्गिक वायू, खाण, शिक्षण या क्षेत्रांची लालफितीच्या कारभारातून सुटका करण्याचे पंतप्रधानांनी ठरविले आहे.
त्यासाठी नवीन सरकारच्या पहिल्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात या गोष्टींवर भर देण्यात येईल. असे घडल्यास राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा विकास दर आणखी अडीच टक्क्यांनी वाढविणे सहज शक्य होईल.
>नदीजोडणी प्रकल्पांना प्राधान्य
पिण्याचे पुरेसे पाणी, नद्या परस्परांशी जोडणे या कामांना मोदी पुन्हा सत्तेवर आल्यास अग्रक्रम दिला जाईल. ब्रह्मपुत्रा नदीवर चीन त्याच्या हद्दीत वरच्या अंगाला जी धरणे बांधत आहे, त्यामुळे भारतात पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी धरणे, कालवे यांचे जाळे उभारण्याचा मानस आहे. नद्याजोडणी प्रकल्पाद्वारे तामिळनाडूला पुरेसे पाणी मिळावे, याकडे लक्ष देण्यास मोदींनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे. रस्ते, विमानतळ, बंदरे आदींचा विकास तसेच नव्या प्रकल्पांचा विचारही या १०० दिवसांच्या कार्यक्रमात केला जाईल.