आता खुद्द ममता बॅनर्जींच्या घरातच बंडखोरी? भावानं दिले भाजपत जाण्याचे संकेत!
By श्रीकृष्ण अंकुश | Published: January 13, 2021 09:17 PM2021-01-13T21:17:20+5:302021-01-13T21:18:27+5:30
कार्तिक बॅनर्जी म्हणाले, केवळ बंगालच नाही, तर देश आणि संपूर्ण जगात ज्यांच्यामध्ये गुणवत्ता आहे, त्यांनाच राजकारणात जागा मिळायला हवी. काही लोक म्हणतात, की ते लोकांसाठी काम करणार, मात्र निवडणुकीनंतर ते केवळ आपले कुटुंबच पाहतात.
कोलकाता -पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या घरातच आता बंडखोरीचा सूर निघू लागला आहे. ममता बॅनर्जी यांचा सक्का भाऊ कार्तिक बॅनर्जी यांनी आता राजकारणात येण्याचे संकेत दिले आहेत. एका वृत्त वाहिनीशी बोलताना ते म्हणाले, बंगालमध्ये बाहेरील, असा काही मुद्दाच नाही. तसेच यावेळी नाव न घेता त्यांनी घराणेशाहीवरही जोरदार टीका केली. 'घराणेशाही' राजकारणासाठी योग्य नाही, असे ते म्हणाले. यावरून कार्तिक बॅनर्जी हे भाजपत सामील होण्याचे संकेत मिळत आहेत.
कार्तिक बॅनर्जी म्हणाले, "केवळ बंगालच नाही, तर देश आणि संपूर्ण जगात ज्यांच्यामध्ये गुणवत्ता आहे, त्यांनाच राजकारणात जागा मिळायला हवी. काही लोक म्हणतात, की ते लोकांसाठी काम करणार, मात्र निवडणुकीनंतर ते केवळ आपले कुटुंबच पाहतात. मी ममता बॅनर्जींचा भाऊ आहे, याचा अर्थ असा नाही, की मला राजकारणात जागा मिळायलाच हवी. ज्यांच्यात योग्यता आहे, त्यांना राजकारणात स्थान मिळायलाच हवे. तेच योग्य असेल." भाजपमध्ये जाण्यासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेवर बोलताना ते म्हणाले, "आपल्या ऋषी-मुनींनी जे सांगितले आहे, आपल्याला त्यांनी सांगितलेल्या मार्गावरच पुढे चालावे लागेल."
तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत सूत्रांचे म्हणणे आहे, की कार्तिक बॅनर्जी हे अभिषेक बॅनर्जीवर नाराज आहेत. अभिषेक बॅनर्जी हे ममता बॅनर्जी यांचे पुतणे आहेत. यामुळे त्यांनी कुणाचे नाव तर घेतले नाही. पण घराणेशाहीवर निशाणा साधत त्यांनी याकडेच इशारा केला आहे.
काही दिवसांपूर्वी टीएमसीला रामराम ठोकत भाजपत सामील झालेले शुभेंदू अधिकारी देखील अभिषेक बॅनर्जींवर टीका करत होते. अधिकारी यांनी आरोप केला होता, की ममता बॅनर्जी या केवळ चेहरा आहेत. पक्ष अभिषेक बॅनर्जीच चालवत आहेत. कार्तिक बॅनर्जी यांनी अद्याप आपले पत्ते उघड केलेले नाहीत, मात्र, 'घराणेशाही'वर निशाणा साधून त्यांनी बंगालच्या राजकारणात बरेच संकेत दिले आहेत.