"ममता बॅनर्जी आधी बंगालसाठी लढल्या, आता त्यांना भारतासाठी लढायचंय..."
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 10:36 AM2021-07-30T10:36:06+5:302021-07-30T10:41:27+5:30
Mamata Banerjee and Javed Akhtar meet:ममता बॅनर्जी चार दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर आल्या आहेत, यादरम्यान त्यांनी नरेंद्र मोदींसह अनेक विरोधी नेत्यांच्या भेटी घेतल्या.
नवी दिल्ली: प्रसिद्ध लेखक-गीतकार जावेद अख्तर आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री शबाना आजमी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची गुरुवारी भेट घेतली. त्या भेटीदरम्यान ममतांनी जावेद अख्तर यांना तृणमूल काँग्रेसचे स्लोगन 'खेला होबे'वर गाणे लिहीण्याची विनंती केली. ममता बॅनर्जी चार दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर आल्या आहेत, यादरम्यान त्यांनी नरेंद्र मोदींसह अनेक विरोधी नेत्यांच्या भेटी घेतल्या.
ममतांच्या भेटीनंतर जावेद अख्तर यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मला इतरांचं माहित नाही, पण माझ्या मते देशात परिवर्तन व्हायलाच हवं. देश सध्या तणावाखाली जगतोय, ध्रुवीकरणाच्या मुद्यावर अनेकजण आक्षेपार्ह विधानं करतायत. देशात ठिकठिकाणी हिंसेच्या घटना घडतात, दिल्लीतील दंगली याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. या गोष्टी व्हायला नको होत्या, असे मत त्यांनी व्यक्त केले.
बंगालने नेहमी क्रांतीकारी आंदोलनांचे नेतृत्व केले
जावेद अख्तर पुढे म्हणाले की, बंगालला मोठा इतिहास आहे. त्या राज्याने नेहमीच क्रांतीकारी आंदोलनाचांचे नेतृत्व केलंय. बंगालरचे कलाकार आणि बौद्धिक लोक ममतांना पाठिंबा देतात. यावेळी पत्रकारांनी जावेद अख्तर यांना प्रश्न विचारला की, ममतांनी भाजपाविरोधी आघाडीचे नेतृत्व करावं का ? त्यावर अख्तर म्हणाले, मी ममतांनी अनेक मुद्यांवर चर्चा केली. पण, त्यांनी कधीच आघाचीचे नेतृत्व करण्याची आशा व्यक्त केली नाही. पण, त्या परिवर्तनामध्ये विश्वास करतात. आधी त्या बंगालसाठी लढल्या, आता त्यांना भारतासाठी लढायचं आहे. मुळात नेतृत्व कोण करेल, हा मुद्दा नसून तुम्हाला कसा भारत हवा आहे, हा प्रमुख मुद्दा आहे, असेही अख्तर म्हणाले.