Mamata Banerjee: संपूर्ण देशात 'खेला' होणार, २०२४ ची निवडणूक मोदी विरुद्ध संपूर्ण देश अशी रंगणार!; ममता बॅनर्जींचा एल्गार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 04:52 PM2021-07-28T16:52:12+5:302021-07-28T16:53:00+5:30
Mamata Banerjee: दिल्ली दौऱ्यावर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
Mamata Banerjee: दिल्ली दौऱ्यावर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. संपूर्ण देशात खेला होबे होणार आणि २०२४ सालची निवडणूक मोदी विरुद्ध संपूर्ण देश अशी रंगणार, असं विधान ममता बॅनर्जी यांनी केलं आहे.
विरोधी पक्षाचं कमान तुम्ही सांभाळणार का? असा विचारण्यात आलं असता "मी काही राजकीय ज्योतिषी नाही. हे पूर्णपणे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. आज मी सोनिया गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्यासोबत बैठक आहे. संसदेच्या सत्रानंतर विरोधी पक्षांची बैठक व्हायला हवी", असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. (Mamata banerjee targets pm narendra modi said 2024 general election will be modi vs country)
विरोधी पक्षाचं गणित हे राजकीय पक्षांवर अवलंबून आहे. जर कुणी याचं नेतृत्व करणार असेल तर मला काहीच हरकत नाही. मी कुणावरही माझं म्हणणं लादू इच्छित नाही. सध्या अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. याबाबत संसदीय अधिवेशनानंतर प्रमुख पक्षांसोबत बैठक घेऊन चर्चा करू, असं ममता म्हणाल्या.
पुढील ६ महिन्यांत परिणाम दिसतील
"सोनिया आणि केजरीवाल यांच्याशी भेट होणार आहे. लालू यादव यांच्याशीही चर्चा झाली आहे. सर्वजण एकत्र येऊ इच्छित आहेत. सोनिया गांधी देखील विरोधी पक्षांनी एकत्र यावं या भावनेच्या आहेत. त्यांच्यासोबतच्या बैठकीत याबाबत चर्चा केली जाईल. विरोधी पक्ष म्हणून सर्वजण एकत्रितरित्या गांभीर्यानं काम करू लागलो तर येत्या ६ महिन्यांत याचे परिणाम दिसू शकतात", असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
देशातील सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांशी माझे चांगले संबंध आहेत. जर येत्या काळात राजकीय वादळ निर्माण झालं तर त्याला कुणीच थांबवू शकत नाही. खेला होबेचा नाद आता संपूर्ण देशात घुमणार आहे. आतापर्यंत अच्छे दिनची वाट खूप पाहिली आता आम्हाला सच्चे दिन पाहायचे आहेत, असंही त्या म्हणाल्या.