ममता बॅनर्जींचा पुन्हा खेला होबे; लवकरच भाजपला आणखी धक्के देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 05:49 AM2021-06-14T05:49:08+5:302021-06-14T05:50:38+5:30
पक्ष सोडून गेलेल्यांशी मुकुल रॉय संपर्कात . मेघालयचे माजी राज्यपाल तथागत रॉय यांनी दावा केला की, मुकुल रॉय ट्रोजन घोड्यासारखे होते. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून केंद्र आणि राज्यातील नेत्यांची रणनीती माहिती करून घेतली आणि त्याची माहिती ममता बॅनर्जींना दिली.
कोलकाता : ज्येष्ठ नेते आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे माजी सहकारी मुकुल रॉय यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) प्रवेश केल्यानंतर आता राज्यातील राजकीय खेळ पुन्हा रंगू लागला आहे.
टीएमसी सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांशी मुकुल रॉय यांनी संपर्क साधणे सुरू केले आहे. या नेत्यांना पुन्हा टीएमसीत घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
त्याचसोबत भाजपचे जुने नेते आणि कार्यकर्ते यांनाही आपल्या तंबूत ओढण्याचे काम टीएमसीने सुरू केले आहे. सूत्रांनुसार आतापर्यंत २५ जणांची प्राथमिक यादी बनवण्यात आली आहे, तर १०० पेक्षा अधिक भाजप नेते असे आहेत जे त्यांच्या परिसरात वर्चस्व राखून आहेत. मुकुल रॉय यांच्या भरवशावर त्यांनी टीएमसी सोडून भाजपत प्रवेश केला होता. या नेत्यांना टीएमसीत पुन्हा घेण्याची रणनीती आखली जात आहे.
आतापर्यंत सब्यासाची दत्ता, राजीव बनर्जी, प्रबीर घोषाल आदी नेत्यांशी मुकुल रॉय यांचा फोनवरून संपर्क झाला आहे. हे नेते टीएमसीत प्रवेश करतील, असे म्हटले जात आहे.
‘ते’ ट्रोजन घोड्यासारखे
मेघालयचे माजी राज्यपाल तथागत रॉय यांनी दावा केला की, मुकुल रॉय ट्रोजन घोड्यासारखे होते. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून केंद्र आणि राज्यातील नेत्यांची रणनीती माहिती करून घेतली आणि त्याची माहिती ममता बॅनर्जींना दिली.