भाजपाला सत्तेतून हटवण्यासाठी ममता बॅनर्जींची रणनीती; विरोधकांनी दिल्लीत महत्त्वाची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 05:54 AM2021-07-26T05:54:12+5:302021-07-26T05:55:43+5:30
ममता यांच्या पुढाकाराने विरोधकांची बुधवारी बैठक, आघाडीबाबत होणार चर्चा
कोलकाता : केंद्रातून भाजपला सत्तेवरून हटविण्यासाठी विरोधी पक्षांची आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नांत आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला आहे. विरोधी पक्षांची एक बैठक दिल्लीतील वंग भवनमध्ये बुधवारी (दि. २८) होणार असून, त्याला ममता बॅनर्जी उपस्थित राहाणार आहेत.
ममता २६ ते ३० जुलै या कालावधीत दिल्लीचा दौरा करणार आहेत. त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी भेट घेतील व त्यानंतर दुपारी ३ वाजता वंग भवनमधील बैठकीलाही उपस्थित राहातील, असे तृणमूल काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले. विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी सुरू असलेल्या बैठका कोणत्याही नेत्याच्या घरी आयोजित करायच्या नाहीत, असे ठरविण्यात आले आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांची एक बैठक बोलवावी, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांना दि. २१ जुलै रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत केले होते. आता तमाम विरोधी पक्षांची येत्या बुधवारी बैठक बोलाविण्यात तृणमूल काँग्रेसनेच पुढाकार घेतला आहे. या बैठकीच्या तयारीसाठी तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी व निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर सध्या दिल्लीत तळ ठोकून आहेत. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांत भाजपचा पराभव करून ममता बॅनर्जी पुन्हा सत्तेवर आल्या.
अभिषेक बॅनर्जीही झाले सक्रिय
ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांना तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस करण्यात आले आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपशी लढा देण्याकरिता आता तृणमूल काँग्रेसने दिल्लीतूनही प्रयत्न करावे, असा त्यांचा विचार आहे. तो त्यांच्या पक्षाने उचलून धरला. २२ जून रोजी तृणमूल काँग्रेसचे उपाध्यक्ष यशवंत सिन्हा यांनी शरद पवार यांची दिल्लीत भेट घेऊन विरोधी पक्षांच्या एकत्र येण्याबाबत चर्चा केली होती.