पवारांनी माझी जात कधीही काढली नाही : मनोहर जोशी
By यदू जोशी | Published: April 19, 2019 05:14 AM2019-04-19T05:14:28+5:302019-04-19T05:17:05+5:30
मी चार वर्षे राज्याचा मुख्यमंत्री असताना शरद पवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते.
यदु जोशी
मुंबई : मी चार वर्षे राज्याचा मुख्यमंत्री असताना शरद पवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. त्या काळात मी ब्राह्मण असल्याचा संदर्भ घेत त्यांनी माझ्यावर कधीही टीका केली नाही. मात्र, अलीकडे काही बाबतीत ते सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या जातीवरून बोलत असतील तर ते अयोग्यच आहे, असे मत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी आज ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.
पुणेरी पगडी-फुले पगडी, पेशव्यांनी छत्रपतींना नेमणे अशा काही वाक्यांवरून फडणवीसांनी पवारांवर केलेले आरोप आणि फडणवीस जातीपातीचे राजकारण करतात हा पवारांचा आरोप याबद्दल आपल्याला काय वाटते?
मी आणि फडणवीसही ब्राह्मण आहोत. फडणवीस नेहमीच जातीच्या पलीकडे जाऊन कारभार करतात असे माझे स्पष्ट मत आहे. पवार यांनीही जातीवरून माझ्यावर कधी टीका केली नाही. फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे पवार अशी काही वाक्ये बोलत असतील तर ते अयोग्यच आहे. मात्र एखादे असे वाक्य पवारांनी उच्चारले म्हणून ते जातीयवादी ठरत नाहीत. राजकारणात जिंकण्यासाठी माणसं जातीयवादी विचार करतात आणि पवारांच्या अशा वाक्यांमधून तोच विचार व्यक्त झालेला दिसतो. मराठी माणसांच्या हितासाठी पवार आणि माझ्या उपस्थितीत स्थापन झालेल्या जागतिक मराठी चेम्बरला यंदा २५ वर्षे पूर्ण होताना ते पुन्हा जातीचे बोलत असतील तर ते अयोग्य आहे. शिवसेनेने तर कधीही जातीयवाद केलेला नाही.
राज ठाकरे युतीविरोधात सभा घेत आहेत. त्याबाबत आपल्याला काय वाटते? या सभांचा त्यांना राजकीय फायदा होईल का?
राजच्या सभा मी ऐकतोय. त्यांचे वक्तृत्व आवेशपूर्ण आहे, गर्दीही चांगली असते; पण उत्तम गर्दी ही उद्धवजींच्या सभांना असते. लोकशाहीत नेत्याने केवळ प्रचारक होऊन चालत नाही. यशस्वीतेसाठी काही जागा निवडून आणाव्या लागतात. राज यांच्या नुसत्या भाषणांनी जे मिळेल ते इतरांना. त्यांना राजकारणात यशस्वी होण्यासाठीची गरज नुसत्या भाषणांमधून पूर्ण होत नाही. मराठी माणसांचा, हिंदुत्वाचा विचार त्यांच्यासमोर असेल तर त्यांनी शिवसेनेसोबत यायला हवे. या दोन भावांचे एकत्र येणे आता फार दूर राहिलेले नाही. ही दोन माणसे एकत्र आली तर मराठी माणूस एक होईल. भाजपसारखा राष्ट्रीय पक्ष शिवसेनेला सोबत घेऊ शकतो तर राज यांनी तडजोड करायला हरकत नाही.
राज्य आणि देशातील निवडणूक निकालाचे चित्र कसे असेल?
मी जोशी आहे ज्योतिषी नाही. चार राज्यांत काँग्रेस जिंकेल असे कुणालाही वाटले नव्हते. वातावरणावरून मतदारांचे मन ओळखणे कठीण असते. ठासून विजयाबाबत बोलणारी माणसे हरतात आणि भलतेच निवडून येतात; पण, निष्ठावान शिवसैनिक म्हणून मी एकच सांगेन की केंद्रात भाजप प्रणीत एनडीए सरकारच सत्तेत येईल.
>राज यांच्या भाषणाचे स्क्रीप्ट बारामतीत लिहिले जाते असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणताहेत. आपल्याला काय वाटते?
(हसत) पवार आणि माझी मैत्री तुटेल त्या दिवशी मी या स्क्रीप्टबाबतचे उत्तर देईन! पवारांचा हा राज फॉर्म्युला यशस्वी झाल्याचे निवडणूक निकालाने सिद्ध झाले तर असे फॉर्म्युले घेण्यासाठी सगळ्यांनी बारामतीत जाऊन राहावे, असा सल्ला मी देईन. राज यांचा प्रयोग नवीन आहे आणि सोपा आहे. सध्या तो टेन्शन फ्री माणूस आहे. कुणाला निवडून आणण्याची जबाबदारी नाही. बघू या काय होते ते? सध्या ते ज्यांना मदत करताहेत त्यांना निवडणुकीनंतर काय मागतात आणि समोरचे काय देतात यावर राजकारण ठरेल.