"अनेकांनी शिवसेनेला गृहित धरलं, पण शिवसेना फरफटत जाणारा पक्ष नाही"
By बाळकृष्ण परब | Published: December 3, 2020 06:23 PM2020-12-03T18:23:42+5:302020-12-03T18:28:50+5:30
Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला नाव न घेता जोरदार टोले लगावले.
मुंबई - उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर आले होते. या सरकारने नुकतेच एक वर्ष पूर्ण केल्याप्रित्यर्थ आज महाविकास आघाडीतर्फे ' महाराष्ट्र थांबला नाही.महाराष्ट्र थांबणार नाही.' पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला नाव न घेता जोरदार टोले लगावले. शिवसेनेला अनेकांनी गृहित धरले. मात्र शिवसेना फरफटत जाणारा पक्ष नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
'महाराष्ट्र थांबला नाही.महाराष्ट्र थांबणार नाही', या पुस्तिकेचे प्रकाशन राष्ट्रावादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेला अनेकांनी गृहित धरले. मात्र शिवसेना फरफटत जाणारा पक्ष नाही.जनतेच्या विश्वासाने हे सरकार चाललं आहे. तीन चाकी सरकार म्हणून या सरकारची हेटाळणी केली जाते. मात्र या सरकारचं चौथं चाक हे जनतेच्या विश्वासाचं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'महाराष्ट्र थांबला नाही. महाराष्ट्र थांबणार नाही.' पुस्तिकेचे प्रकाशन- LIVE https://t.co/aOxK37WSUj
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 3, 2020
यावेळी कोरोनाकाळातील परिस्थितीवरही उद्धव ठाकरेंनी भाष्य केले. ते म्हणाले की, आम्ही राज्यातील कोरोनाचे आकडे लपवले नाहीत. आम्ही कोरोनावर लवकरच मात करू. नैसर्गिक संकटांना महाराष्ट्र कधी घाबरला नाही आणि आणि घाबरणारही नाही. तसेच जर कुणी राजकीय संकट आणत असेल. तर ते संकट मोडून तोडून काढल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उद्धव यांनी व्यक्त केला.