Sanjay Raut: “मुंबईत अनेक अनधिकृत बांधकाम; काही चुकीचं केलं असेल तर गप्प बसावं, अन्यथा..."
By प्रविण मरगळे | Updated: November 14, 2020 13:08 IST2020-11-14T12:56:45+5:302020-11-14T13:08:01+5:30
Sanjay Raut Interview with Kunal Kamra News: मुंबई महापालिकेने ती कारवाई केल्यावर आम्ही तशा आशयाची हेडलाईन देऊन बातमी केली असा टोला राऊतांनी लगावला.

Sanjay Raut: “मुंबईत अनेक अनधिकृत बांधकाम; काही चुकीचं केलं असेल तर गप्प बसावं, अन्यथा..."
मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिच्या अनाधिकृत कार्यालयावर मुंबई महापालिकेने जेसीबी फिरवला होता, या कारवाईविरोधात कंगनानं उच्च न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले होते, कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील वादामुळेच मुंबई महापालिकेने तत्परतेने कारवाई केली असा आरोप विरोधकांनी केला होता, या संपूर्ण प्रकरणात शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून ‘उखाड दिया’ अशा हेडिंगने बातमी दिली होती.
कॉमेडियन कुणाल कामराच्या कार्यक्रमात या हेडिंगवरुन संजय राऊतांना प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर संजय राऊत यांनी कंगनाचं नाव घेता तिला फटकारलं, राऊत म्हणाले की, अभिनेत्रीच्या अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने तोडक कारवाई केली,ती कारवाई आम्ही केली नाही, परंतु सामनाची स्वत:ची स्टाईल आहे, हेडलाईन वेगळी असते. कंगना राणौत म्हणाली होती, मी मुंबईत येतेय, कोणालाही काही उखडायचं असेल तर उखडावं, त्यामुळे महिलेचा सन्मान करणं आमचं काम आहे. त्यानंतर मुंबई महापालिकेने ती कारवाई केल्यावर आम्ही तशा आशयाची हेडलाईन देऊन बातमी केली असा टोला राऊतांनी लगावला.
तसेच अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी जेसीबी खूप महत्वाचं असतं, मुंबईत अनेक अनधिकृत बांधकामे आहेत, स्टुडिओपण अनधिकृत कामं आहेत, एक फिल्मी डायलॉग आहे “जिनके घर शिशे के होते है वो दुसरो के घरपर पत्थर नही फेका करते” त्यामुळे आमच्याकडे दगड(पत्थर) आहेत, ते बाहेरून फेकू शकतो आणि आतमधूनही फेकू शकतो. जर तुम्ही काही चुकीचं केलं असेल तर गप्प बसावं, काही चुकीची काम लपवण्यासाठी गप्प बसावं, आमच्यावर दगडं फेकू नयेत, आम्ही तुम्हाला अनेकदा मदत केली आहे असा इशारा संजय राऊत यांनी कंगना राणौतला दिला आहे.
“हिशोब सगळ्यांनाच द्यावा लागतो, चौकशी तुमचीही होऊ शकते”; संजय राऊतांचा भाजपाला इशारा
सुशांत बिहारचा नव्हे तर मुंबईचा मुलगा
सुशांत सिंग राजूपतला मी बिहारचं मानत नाही, तो मुंबईचा आहे, मुंबईत येऊन सुशांतची ओळख निर्माण झाली, सुशांत आमचा मुलगा आहे, त्याच्यासोबत चुकीचं झालं असेल तर आम्ही त्याला न्याय देऊ, किंचाळूच चुकीचं बोलणं खरं होत नाही. जे सत्य असते ते शांतपणेही त्याचं काम सुरु ठेवतं. जे सत्य आहे ते लपवून नवीन काही शोधायचं प्रयत्न सुरू होता असा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला.
“या देशात कोणीही सेक्युलर नाही, सेक्युलरची भाषा करणारे सर्वात जास्त धर्मांध"
तसेच सुशांत राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशी करण्याची तुम्हाला कोणाची ऑर्डर होती का? ठराविक लोकांनाच टार्गेट करायचं हे सांगितलं होतं का? मुंबई पोलिसांनी जो तपास केला तो शतप्रतिशत खरा होता, जगातील सर्वोत्तम पोलिसांमध्ये मुंबई पोलिसांचा समावेश आहे. वर्दीचा सन्मान राखला पाहिजे, मुंबई पोलिसांना माफिया म्हणता आणि त्यांच्याच सुरक्षेत फिरता, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलतात, शरद पवारांविरोधात बोलतात, त्या व्यक्तींसोबत पोलिसांनी राहू नये हे आम्ही बोललो नाही. पोलीस त्यांचे काम करतात, त्या व्यक्तीची सुरक्षा करणे हे सरकारचं काम आहे असं राऊत म्हणाले.