...तर दिल्लीची गादी हस्तगत करू; जानकरांनी थेट शरद पवारांसमोरच मांडला 'लोकसभे'चा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 07:46 PM2021-02-13T19:46:08+5:302021-02-13T19:47:42+5:30
Ahilyadevi Holkar Statue on Jejuri fort : राष्ट्रवादीचे आमदार आणि पवार साहेबांचे नातू रोहित पवार ज्या मतदारसंघातून निवडून आले तिथेच माझ्या पक्षाची स्थापना झाली. सांगण्याचा उद्देश असा की, आम्ही धनगर चळवळीतून पुढे आलो आहोत, असे महादेव जानकर म्हणाले.
पुणे : जेजुरी गडावरील अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शनिवारी शरद पवार यांच्या हस्ते अनावरण झाले. या सोहळ्याआधी आलेले इंदौरच्या होळकर राजघराण्याचे पत्र, भाजपाच्या नेत्यांनी घातलेला गोंधळ यामुळे वातावरण तापलेले होते. यातच आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसमोर (Sharad Pawar) राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी थेट दिल्लीच्या तख्ताचे समीकरण मांडल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Maratha and Holkar people can win Delhi in Loksabha, Mahadev Jankar to Sharad pawar)
राष्ट्रवादीचे आमदार आणि पवार साहेबांचे नातू रोहित पवार ज्या मतदारसंघातून निवडून आले तिथेच माझ्या पक्षाची स्थापना झाली. सांगण्याचा उद्देश असा की, आम्ही धनगर चळवळीतून पुढे आलो आहोत. त्याच भूमीत अहिल्याबाई होळकर यांचा जन्म झाला, असे जानकर म्हणाले. या कार्यक्रमाला होळकर घराण्याचे वंशज आणि छत्रपती संभाजीराजे भोसले हेदेखील उपस्थित होते.
मराठा आणि होळकर समाजाची शिवरायांनी सोयरिकीची मोट बांधली होती. याचा आधार घेत जानकरांनी जाणत्या पवारांना दिल्लीची गादी हस्तगत कशी करता येईल, याबाबत सांगितले. आमचा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) असला तरी शरद पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगले संबंध आहेत. धनगर समाजाला अनुसूचित जातींच्या (ST) सवलती मिळण्यासाठी शरद पवार यांनी आशीर्वाद द्यावेत. मराठा आणि धनगर समाज एकत्र आला तर आपण दिल्लीची गादी हस्तगत करु शकतो, असे जानकर म्हणाले.