औकातीत राहा... मानसिक उपचार घ्या...; चंद्रकांत पाटील अन् अशोक चव्हाणांमध्ये जुंपली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 06:26 PM2021-05-14T18:26:32+5:302021-05-14T18:27:17+5:30
Maratha Reservation: मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द; काँग्रेस आणि भाजपच्या बड्या नेत्यांमध्ये जुंपली
मुंबई: अशोक चव्हाणांनी औकातीत राहावं, असं म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना चव्हाणांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. त्यांना मानसिक उपचार घेण्याची नितांत आवश्यकता आहे, अशा शब्दांत चव्हाण यांनी पाटील यांच्यावर पलटवार केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पाटील आणि चव्हाण यांच्यात जोरदार वाकयुद्ध सुरू आहे.
'सत्ता गेल्याचे नैराश्य, पुन्हा सत्ता मिळत नसल्याची हतबलता आणि मराठा आरक्षणाच्या 'फुलप्रुफ'तेचा सर्वोच्च न्यायालयात भांडाफोड झाल्याने आ. चंद्रकांत पाटील यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ते बेताल विधाने करीत असून त्यांनी चांगले मानसिक उपचार घेण्याची नितांत गरज आहे. प्रचंड ताणतणावामुळे आ. चंद्रकांत पाटील सैरभैर झाले आहेत. नेमके काय बोलावे हे कळेनासे झाल्याने शब्द निवडताना सतत त्यांचा तोल सुटतो आहे. पण योग्य मानसिक उपचारातून या समस्येवर नक्कीच मार्ग निघू शकेल, अशी मला अपेक्षा आहे,' असा सणसणीत टोला चव्हाण यांनी लगावला आहे.
सत्ता गेल्याचे नैराश्य, पुन्हा सत्ता मिळत नसल्याची हतबलता आणि मराठा आरक्षणाच्या 'फुलप्रुफ'तेचा सर्वोच्च न्यायालयात भंडाफोड झाल्याने आ. चंद्रकांत पाटील यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ते बेताल विधाने करीत असून त्यांनी चांगले मानसिक उपचार घेण्याची नितांत गरज आहे.
— Ashok Chavan (@AshokChavanINC) May 14, 2021
मराठा आरक्षणाचा कायदा गेल्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला. त्यावरून भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना लक्ष्य केलं. अशोक चव्हाणांनी केंद्र सरकारकडे बोट दाखवू नये. त्यांनी स्वत: राज्यासाठी काही तरी करून दाखवावं. चव्हाणांनी औकातीत राहावं. त्यांची औकात काय आहे हे आम्हाला माहीत आहे. आम्ही काय करावं ते आम्हाला सांगू नये, अशी घणाघाती टीका पाटील यांनी केली होती.