Maratha Reservation: मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही याचिका राष्ट्रवादीनं स्पॉन्सर्ड केल्यात, फडणवीसांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 05:17 PM2021-05-05T17:17:12+5:302021-05-05T17:18:12+5:30
देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मोठा आरोप केला आहे.
सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य सरकार आणि भाजपमध्ये जोरदार राजकारण सुरू झालं आहे. राज्य सरकारनं निष्काळजीपणा दाखवल्यामुळे हाती निराशा लागल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यावर राज्य सरकारनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री अशोक चव्हाण आणि नवाब मलिक यांनी फडणवीस जनतेची दिशाभूल करण्याचं काम करत असल्याचं म्हटलं. याच्या प्रत्युत्तरात देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मोठा आरोप केला आहे. (Maratha Reservation Devendra Fadnavis Allegations Against Ashok Chavan And Nawab Malik)
मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही याचिका राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पॉन्सर्ड आहेत, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्याच काही लोकांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केल्या होत्या, असं फडणवीस म्हणाले.
राष्ट्रवादीच्याच काही लोकांनी याआधी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केल्या होत्या. त्यांच्या काही लोकांशी बैठका देखील झाल्या होत्या. राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांना खोटं बोलण्याचा रोग जडला आहे, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्य सरकारच्या पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषद घेत सरकारला प्रत्युत्तर दिलं आहे.
"मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली तेव्हा फडणवीसांची आठवण झाली. त्याआधी चर्चेला बोलवलं नाही. आम्ही कायदा कोर्टात टिकवला होता. पण हे लोक टिकवू शकले नाहीत. आम्ही योग्य समन्वय साधून मराठा आरक्षण कायदा टिकवला असता", असा दावाही फडणवीस यांनी यावेळी केला आहे.
भाजपने केलेला कायदा घटनादुरुतीपूर्वीचाच
केंद्र सरकारच्या अॅटर्नी जनरल यांनी १०२ व्या घटनादुरुस्तीनंतर राज्यांना आता अधिकार नाहीत. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद सरकारनं पुढाकार घेऊन निर्णय घ्यावा, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं होतं. त्यावर प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी 102 वी घटनादुरुस्तीपूर्वी भाजप सरकारने हा कायदा केला होता. आम्ही त्या कायद्याला अमेंड करतोय. आम्ही हा जो कायदा केला आहे तो 102 व्या घटनादुरुस्तीने बाधित होत नाही. कारण ते कायदा घटनादुरुस्ती करण्यापूर्वीचा आहे. आता आम्ही तो फक्त अमेंड करतोय. त्यामुळे अशोक चव्हाण आणि नवाब मलिक खोटं बोलत आहेत, असा दावाही फडणवीस यांनी केलाय.