“देवेंद्र फडणवीस, तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलंय; माशा मारण्याचा आनंद घ्या”
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 10:48 AM2021-05-15T10:48:21+5:302021-05-15T10:51:50+5:30
मराठा आरक्षणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर घणाघात केला होता. त्यावर महाविकास आघाडीच्या मंत्र्याने फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.
मुंबई - देवेंद्र फडणवीस, तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे? आम्ही लोकांचे जीव वाचवण्यासाठी काम करत आहोत व करत राहू. तुम्ही माशा मारण्यातच आनंद घ्या. गरज पडल्यास भाजपाने माशा मारणे स्पर्धाही भरवावी! असा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.(NCP Nawab Malik Target BJP Devendra Fadnavis Over Maratha Reservation Issue)
मराठा आरक्षणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर घणाघात केला होता. मराठा आरक्षणावरून राज्य सरकार केद्राकडे बोट दाखवतंय. केंद्रानेच सगळं करायचं आणि आम्ही मात्र राज्यात माशा मारत बसणार व दिलेले आरक्षण गमावून बसणार हे आणखी किती दिवस चालणार असा टोला फडणवीसांनी राज्य सरकारला लगावला होता. त्यावर नवाब मलिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
फडणवीसजी तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे? आम्ही लोकांचे जीव वाचवण्यासाठी काम करत आहोत व करत राहू. तुम्ही माशा मारण्यातच आनंद घ्या. गरज पडल्यास भाजपा माशा मारणे स्पर्धाही भरवा!
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) May 15, 2021
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करायला हवी होती. परंतु, महाविकास आघाडी सरकार टाइमपास करीत आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली. फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले, घटनेच्या कलम १०२ मध्ये दुरुस्ती केल्यानंतर केंद्र सरकारने हे स्पष्ट केले होते की, कुठल्याही समाजाला मागास घोषित करण्याचा अधिकार राज्याकडेच राहील; परंतु सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठात यासंदर्भात एकमत झाले नाही.
औकातीत राहा... मानसिक उपचार घ्या...
'सत्ता गेल्याचे नैराश्य, पुन्हा सत्ता मिळत नसल्याची हतबलता आणि मराठा आरक्षणाच्या 'फुलप्रुफ'तेचा सर्वोच्च न्यायालयात भांडाफोड झाल्याने आ. चंद्रकांत पाटील यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ते बेताल विधाने करीत असून त्यांनी चांगले मानसिक उपचार घेण्याची नितांत गरज आहे. प्रचंड ताणतणावामुळे आ. चंद्रकांत पाटील सैरभैर झाले आहेत. नेमके काय बोलावे हे कळेनासे झाल्याने शब्द निवडताना सतत त्यांचा तोल सुटतो आहे. पण योग्य मानसिक उपचारातून या समस्येवर नक्कीच मार्ग निघू शकेल, अशी मला अपेक्षा आहे असा टोला मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपाला लगावला.